गर्भसंस्काराची व्याप्ती खूप मोठी आहे. गर्भधारणा पटकन आणि नैसर्गिक पद्धतीनी होण्यापासून, गर्भाचा सर्वपरीनी विकास होण्यापासून ते सामान्य प्रसूती होण्यापर्यंत आणि बाळ बाळंतीणीची तब्येत व्यवस्थित राहण्यापर्यंत सर्व गोष्टी गर्भसंस्कारांच्या योगे अनुभवता येतात. आणि सुरुवातीपासून शास्त्रशुद्ध गर्भ संस्कार केले तर त्याचे परिणाम ही अप्रतिम येतात. हो अगदी खरंय, गर्भसंस्कार केल्यामुळे गरोदारपणातील प्रत्येक दिवस साजरा झाला, असं अभिमान सांगणाऱ्या आई पाहिल्या की गर्भ संस्कारांचं महत्त्व अजून अजून मनात ठसत जातं. बाळ बाळंतिणीला उपयुक्त आणि संपूर्ण गरोदारपणात तसंच प्रसूतीमध्ये समर्थन करणारं आपल्या सर्वांच्या परिचयाचा द्रव्य म्हणजे केशर.
आयुर्वेदात केशर त्रिदोष हर म्हणजे वात पित्त कफ या तिन्ही दोषांना संतुलित करणारं, विषनाशक आणि चेहऱ्याचा मुळचा रंग सुधारण्यास मदत करणारं म्हणून सांगितलेलं आहे. गरोदारपणात आर्यन आणि हिमोग्लोबिनसाठी पूरक घेण्याचा कल आपल्या सर्वांना माहिती आहे. पण रासायनिक हिमोग्लोबिनच्या गोळ्या किंवा कॅप्सूल घेण्याचे दुष्परिणामसुद्धा विसरून चालणार नाही आणि म्हणूनच गरोदारपणात चांगल्या प्रतीच्या म्हणजे शुद्ध केशराचा नियमित सेवन हा खूप फायदेशीर असतो.
विषनाशक आणि रक्त शुद्धीकर असणारं केशर नियमित घेण्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली राहते, सर्दी खोकला ताप सहसा येत नाही. खऱ्या केशराचा रंग आणि सुगंध इतका सुंदर असतो की त्या सुगंधामुळे मन प्रसन्न होतं, मनातली नकारात्मकता, नैराश्य दूर होण्यासाठी मदत मिळते. गरोदारपणात कमी जास्त होणाऱ्या हार्मोन्समुळे भावनिक चढ-उतार स्थिर होण्यासाठी सुद्धा केशर उपयोगी पडतं. गर्भ संस्कारात शुद्ध, उत्तम गुणवत्ताच्या केशराचं स्थान अढळ आहे हेच खरं, मंडळी हे ऐकून तुमच्या मनात आलं असेल की कसं आणि किती प्रमाणात केशर घ्यायला हवं?
बाजारात सहसा केशराचे पट्ट्या मिळतात. मिठाईमध्ये केशर टाकताना सहसा ते तसेच्या तसे टाकले जातात. आम्ही केशर नक्की टाकलं आहे, हे दाखवून देण्याचा हा एक मार्ग असला तरी केशराचं शोषण होण्यासाठी त्याचं बारीक चूर्ण करणं आवश्यक असतं. यासाठी जाड बुडाच्या पॅनमध्ये अगदी मंद आचेवर केशर थोडं भाजून घ्यावं. खलाच्या मदतीनी त्याचं बारीक चूर्ण तयार करावं. गरोदारपणात रोज सकाळी पंचामृतात किंवा दुधात चिमूटभर केशराचं चूर्ण टाकून घ्यावं.