डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
आपली त्वचा सुंदर असावी असं कोणाला वाटत नाही? काळ्या डागांची एक वेगळी समस्या असते. काळे डाग कमी करण्यासाठी एक साधी पण प्रभावी उपाय आहे. स्वच्छ धुतलेली सहाण घ्यावी. त्यावर लिंबाचा तीन चार थेंब रस पिळावा. यावर दालचिनी उगाळून लेप तयार करावा आणि तो काळ्या डागांवर लावावा. लेप जाड आहे का पातळ, यावर तो किती वेळात वाळेल हे ठरणार असतं आणि आयुर्वेदानुसार लेप वाळण्यास सुरुवात झाली की किंवा लेप पूर्ण वाळण्यापूर्वी काढून टाकायचा असतो.
जर लेप त्वचेवर पूर्णपणे वाळू दिला, तर तो जसजसा वाळतो, तसतशी त्वचा ओढली जाते आणि ते त्वचेसाठी चांगलं नसतं. त्यामुळे लेप पूर्ण सुकण्यापूर्वी पुन्हा एकदा पाण्यानी ओला करावा आणि त्यानंतर हलक्या हातानी काढून टाकावा.
वाढत्या वयाचा परिणाम सर्वप्रथम दिसू लागतो तो त्वचेवर. पण त्वचा घट्ट राहावी, सुरकुत्या येऊ नयेत यासाठी सुद्धा दालचिनी उपयुक्त असते. यासाठी सहाणेवर थोडं दूध घ्यावं. त्यात चंदन उगाळून अर्धा चमचा पेस्ट तयार करावी. अजून थोडं दूध घेऊन त्यात दालचिनीची एक अष्टमांश चमचा पेस्ट तयार करावी.
या दोन्ही पेस्ट नीट एकत्र करून संपूर्ण चेहऱ्यावर लेप लावावा. पूर्ण सुकण्याआधी लेप काढून टाकावा. त्वचा सुंदर आणि निरोगी रहावी यासाठी आहारात घरचं लोणी, साजूक तूप यांचा नियमित समावेश करणं चांगलं असतं. फार आंबट, मसालेदार किंवा तिखट, तळलेल्या गोष्टींपासून दूर राहणं, त्याऐवजी वरण-भात, पोळी किंवा भाकरी, साधी फोडणी घातलेली फळभाजी, कोशिंबीर, जेवणानंतर ताज ताक असा साधा, सात्विक आहार घेणं चांगलं असते.