डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
जवस किंवा अळशीच्या बिया सगळ्यांना माहित आहेत. आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जवस स्निग्ध आणि उष्ण असल्यामुळे वात शामक असतात. त्यामुळे जवसाचा लेप सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतो. पाठ दुखत असेल, गुडघे दुखत असतील तर जवस शिजवावेत. नीट शिजले की जरासे बारीक करून गरम असतानाच दुखणाऱ्या भागावर लेप लावून ठेवावा. थंड झाला की काढून टाकून पुन्हा नवीन लेप लावावा. असं साधारण अर्धा तास करत राहिल्याने आराम मिळतो.
जवसातील स्निग्धतेमुळे सांध्यामधे झालेली झीज भरून यायला सुद्धा मदत मिळते आणि काही दिवसांत दुखणं कमी होतं. जवसाच्या लेपामुळे वेदना आणि सूज या दोन्ही गोष्टी कमी होतात. याचा अजून एक उत्तम उपयोग म्हणजे छातीत कप झाला असेल तर जवसाच्या मदतीनी तो पातळ होऊ शकतो.
यासाठी जवसाचं पीठ घ्यावं, त्यात गरम पाणी मिसळावं. आता हे मिश्रण गरम करत ठेवून जरा घट्ट झालं की त्याचा छातीवर लेप लावावा किंवा जाडसर सुती कापडात पोटली बनवून त्या पोटलीने शेकावे. एका वेळेला साधारण पंधरा मिनिटांसाठी आणि एक दिवस आड असा शेक घेतल्याने आठवड्याभरात कफ पातळ होण्यास सुरुवात होते आणि आराम मिळतो.