स्त्री रूग्णावर उपचार करताना तक्रार कोणतीही असो, त्यावरचे उपचार हे गर्भाशयाच्या माध्यमातूनच केले जातात. अर्थात गर्भाशय शुद्ध आणि निरोगी असेल तर स्त्रीला सहसा कोणता रोग होत नाही. मासिक पाळी वेळेवर म्हणजे दर 28 - 30 दिवसांनी येणं, चार-पाच दिवस व्यवस्थित अंगावरुन जाणं, इतर दिवसात पांढरा स्त्राव वगैरे नसणं ही गर्भाशय निरोगी असल्याची काही मुख्य लक्षणं असतात. पण जर पाळी चार आठवड्याऐवजी दोन ते तीन आठवड्यांमध्ये येऊ लागली, तसेच अंगावरून 15-15 दिवस जाऊ लागलं तर त्याचा अर्थ गर्भाशय अशक्त झालं आहे. म्हणजेच स्त्री संतुलनात बिघाड झाला आहे. स्त्री शरीरातील वात-पित्त दोष असंतुलित झालेले आहेत असा त्याचा अर्थ होत असतो.
त्यामुळे यावर फक्त रक्तस्त्राव थांबवणारे उपचार न घेता गर्भाशयाला आतून मजबूत करण्याची आवश्यकता असते. यावर एक सोपी घरगुती उपाय देखील केला जाऊ शकतो. कोहळा ही फळभाजी यावर उपयुक्त ठरेल. आयुर्वेदात पिकलेला कोहळा सर्वदोष शामक, विशेषतः पित्तास्रनूत् म्हणजे पित्तदोष वाढल्यामुळे होणारा रक्तस्त्राव, कमी करण्यात फार फायदेशीर ठरतो. याशिवाय कोहळा बृंहण म्हणजे शरीराला यथोचित पोषण देणारे फळभाजी आहे. तसेच कोहळा थकलेल्या, क्षीण झालेल्या अवयवांना शक्ती देणारा असल्यामुळे गर्भाशयाची अशक्तता दूर करण्यास देखील मदत करतो.
त्यामुळे ज्या स्त्रीयांना लवकर मासिक पाळी येते, बरेच दिवस अंगावरून जातं, त्यामुळे थकवा जाणवतो, उत्साह वाटत नाही, चिडचिड होते. त्यांच्यासाठी हा उपाय उपयुक्त आहे. यासाठी 100 ग्रॅम कोहळा घ्यावा. कोहळ्याची वरची साल काढून किसणीच्या सहाय्यानी कोहळा किसून घ्यावा. यानंतर फडक्याच्या मदतीनी त्याचा रस गाळून घ्यावा, यातून साधारण पन्नास मिली म्हणजे पाव ग्लास रस मिळतो. आता यात अर्धा चमचा खडीसाखर मिसळावी आणि सकाळी उपाशी पोटी हा रस घ्यावा. मासिक पाळीचे पहिले तीन दिवस वगळता एरवी दररोज हा उपचार करता येतो.