सध्या आजाराचे प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे मुलांना सारखा सर्दी खोकला होत असतो. मुलांना आहारात घरी बनवलेले साजूक तूप देणं, मुगाचा अधिकाधिक वापर करणं, प्यायचं पाणी सुवर्णसिद्ध आणि 20-25 मिनिटांसाठी उकळलेलं असणं हे चांगलं. श्वसन संस्थेचं आरोग्य सुधारण्यासाठी आयुर्वेदात अनेक उत्तमोत्तम औषधं असतात. शुद्ध वंशलोचनयुक्त सितोपलादी चूर्ण सकाळ-संध्याकाळ अर्धा चमचा या प्रमाणात मधासह मिसळून देण्याचा मुलांना नक्की उपयोग होईल.
त्याशिवाय सर्दी खोकला होईल असं वाटू लागेल की, लगेच रुईच्या पानांनी शेक करण्याचाही उपयोग होईल. यासाठी छातीवर अगोदर थोडसं तेल लावावं आणि तव्यावर तीन ते चार रुईची पानं ठेवून ती गरम झाली की शेक लागेल पण चटका लागणार नाही अशा बेतानी छाती शेकावी. आहारात दही, पनीर, चीज, अंडी, सिताफळ, फणस, पेरू, रेडीमेड मिठाया टाळणं सुद्धा चांगलं.
या उपायांनी शारीरिक आरोग्य सुधारलं की त्यामुळे मन एकाग्र होण्याची ताकदही आपोआप वाढेल. बरोबरीनी सकाळ-संध्याकाळ ज्योती ध्यान करण्याचाही अप्रतिम उपयोग होऊ शकेल.अशा सोम ध्यानामुळे मन एकाग्र होण्यासाठी तर मदत मिळतेच पण हार्मोन्स संतुलन होण्यासाठी आणि एकंदर शरीर तसंच मनाची शक्ती वाढण्यासाठी मदत मिळते असा अनुभव आहे.