दैनंदिन आहारात साखरयुक्त पेये जसे की कोल्ड ड्रिंक्स, फळांचे रस, एनर्जी किंवा स्पोर्ट्स ड्रिंक्स यांचा वापर केल्यास टाईप 2 मधुमेहाचा धोका लक्षणीय प्रमाणात वाढतो, असे एका नव्या जागतिक अभ्यासात स्पष्ट झाले आहे. अमेरिकेतील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीच्या पोषण तज्ज्ञांनी केलेल्या या अभ्यासात साखरयुक्त द्रवपदार्थ आणि मधुमेह यामधील थेट संबंध उघड झाला आहे.
हा अभ्यास ‘अॅडव्हान्सेस इन न्यूट्रिशन’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाला असून त्यासाठी जगभरातील पाच लाखांहून अधिक व्यक्तींचा डेटा अभ्यासण्यात आला. संशोधकांनी असे आढळून घेतले की दररोज साखरयुक्त शीतपेयांचे अतिरिक्त 350 मिली सेवन केल्यास मधुमेहाचा धोका तब्बल 25 % पर्यंत वाढतो. विशेष म्हणजे, साखरयुक्त द्रवपदार्थांचे कोणतेही ‘सुरक्षित मर्यादित प्रमाण’ आढळले नाही म्हणजेच अगदी एका ग्लासापासूनही धोका सुरू होतो.
फळांच्या रसाच्या बाबतीतही धोका कमी नसून दररोज 250 मिली रसाचे सेवन केल्यास टाईप 2 मधुमेहाचा धोका 5% ने वाढतो. यात 100 % फळांचा रस, नेक्टर्स आणि अन्य जूस ड्रिंक्स यांचा समावेश आहे.
संशोधकांचे म्हणणे आहे की, पेय स्वरूपातील साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते, ज्यामुळे यकृताचे कार्य बिघडते, यकृतात चरबी साचते आणि इन्सुलिन प्रतिकार वाढतो. याचा थेट परिणाम शरीराच्या चयापचयावर होतो आणि मधुमेहाची शक्यता वाढते.
दुसरीकडे, संपूर्ण फळे, दूध, धान्ये यामध्ये नैसर्गिक साखर असली तरी त्यात फायबर, प्रथिने, चरबी आणि इतर पोषकद्रव्येही असतात. त्यामुळे त्यांचा शरीरावर हळूहळू परिणाम होतो आणि रक्तातील साखरेत झपाट्याने वाढ होत नाही.
या अभ्यासाच्या मुख्य संशोधिका डॉ. करेन डेला कॉर्टे यांनी स्पष्ट केले की, "साखर खाण्यापेक्षा साखर पिणे आरोग्यासाठी अधिक घातक आहे." त्यामुळे पेय पदार्थांतील साखरेबाबत अधिक कडक मार्गदर्शक तत्त्वांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.सारांशतः, साखरयुक्त पेये आहारात मर्यादित ठेवणे हे मधुमेहापासून दूर राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, असे या अभ्यासातून स्पष्ट होते.