डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
तुमच्या दोन्ही पायांवर गुडघ्याच्या खाली वैरिकास नसा म्हणजे, अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींच्या नसा दिसण्यास सुरुवात झाली की फार वेळ उभं राहिलं तरी पाय दुखायला सुरुवात होते. यावर उपाय काय? वैरिकास नसांवर आयुर्वेदाच्या उपचारांचा उत्तम उपयोग होताना दिसतो. यातला सर्वात प्रभावी उपचार म्हणजे पायांना नियमितपणे तेल लावणं.
यासाठी रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यानंतर स्नानापूर्वी, पायांना खालून वर या दिशेनी वात शामक द्रव्यांनी संस्कारित तेल हलक्या हातानी जिरवण्याचा उपयोग होईल. सहचर तेल किंवा चंदनबलालाक्षादि तेल यासाठी वापरता येईल. सतत उभं राहण्याऐवजी किंवा खुर्चीवर बसण्याऐवजी, शक्य असेल तेव्हा मांडी घालून बसणं, रोज सकाळी सूर्यनमस्कार करणं, वज्रासनात बसून, डोकं समोर जमिनीला टेकवणं, जमत असेल तर सर्वांगासन करणं हे सुद्धा चांगलं.
वैरिकास नसा वाढू नयेत आणि आहेत त्या पूर्ववत व्हाव्यात यासाठी आयुर्वेदातल गंडूष किंवा कवल, जे सध्या ऑइल पुलिंग या नावानी लोकप्रिय झालेलं आहे, ते करण्याचाही उपयोग होताना दिसतो. यासाठी इरीमेदादि तेल किंवा साधं कोल्ड-प्रेस्ड तीळाचं तेल, रोज सकाळी दहा मिनिटांसाठी तोंडात धरून ठेवण्याचा, अधून मधून गालातल्या गालात स्क्विश करण्याचाही उपयोग होताना दिसतो. वैरिकास नसांवर अजून एक घरच्या घरी करता येण्याजोगी गोष्ट म्हणजे प्यायचं पाणी सुवर्णसिद्ध करून घेतलेलं असावं.
याचे अजूनही अनेक फायदे असतात पण नियमित सुवर्णसिद्ध जलामुळे वैरिकास नसा कमी होतात असं दिसतं. यासाठी साधारण पाच लिटर पाण्यात 24 कॅरेटचं ५ ग्रॅमचं वळसं किंवा नाणं टाकून, पाणी उकळण्यासाठी ठेवावं. पाण्याला उकळी फुटली की २०-२५ मिनिटांसाठी छान उकळू द्यावं आणि नंतर गाळून घेऊन दिवसभर पिण्यासाठी वापरावं.