2019 साली आलेली कोरोनाची साथ आपण कधीच विसरू शकणार नाही. कोरोना भोवतीचं भीतीचं वलय, लॉकडाऊनमुळे आलेला एकाकीपणा, क्षणभंगूरता म्हणजे काय हे पदोपदी जाणवून देणारी परिस्थिती या सगळ्याचा आपल्यावर कधीही पुसला जाणार नाही असा परिणाम झाला पण यातून एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली की प्रतिकारशक्ती हीच शेवटी तारून नेणारी असते.
लस घेतलं काय, न घेतलं काय? दवाखान्यापर्यंत पोहोचू शकलो काय, न पोहोचू शकलो कास? इंजेक्शन मिळालं काय, न मिळालं काय? या सगळ्याच्या पलीकडे प्रतिकारशक्तीचं वर्चस्व हे कायम राहतं. फक्त महामारीमध्येच नाही तर कोणत्याही रोगात शरीराची मूळ शक्ती चांगली असणं किंवा प्रतिकारशक्तीत सुधारणा करणं हेच महत्त्वाचं असतं.
हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागते तेव्हा अनेकांना सर्दी खोकला तापाचा त्रास होताना दिसतो. पण असा त्रास मुळात होऊ नये यासाठी, त्रास बहुतेक होणार असं जाणवू लागलं तर तो वाढू नये यासाठी किंवा अगदी झालेला असला तरी तो बरा व्हावा यासाठी एक साधा आरोग्य उपचार आज आपण पाहणार आहोत.
यासाठी आपल्याला लागतात घरा अंगणातल्या पाच गोष्टी. दालचिनी, सुंठ, लवंग, तुळस आणि गवती चहा. सर्वप्रथम पातेल्यात दोन कप पाणी घ्यावं. एक ग्राम दालचिनीचा तुकडा, तीन ग्राम सुंठीचा चेचून घेतलेला तुकडा, एक ग्राम लवंग, दहा तुळशीची पानं आणि पाच ग्राम गवती चहा हे सर्व मिश्रण खलबत्त्यामधे थोडंसं कुटून घ्यावं आणि पातेल्यामध्ये टाकावं. आणि मध्यम आचेवर उकळण्यासाठी ठेवावं.
पाणी निम्मं आटलं म्हणजे एक कप शिल्लक राहिलं की गाळून घ्यावं आणि चहा पितो त्याप्रमाणे गरम गरम प्यावं. घसा दुखत असेल, सर्दी होईल असं वाटत असेल, घराबाहेर असताना आपण कुठल्यातरी संसर्गला उघड झाली असं वाटत असेल तर प्रतिबंध म्हणूनही हा चहा घेता येतो. लहान मुलांना सुद्धा निम्म्या प्रमाणामध्ये देता येतो.