आरोग्य मंत्रा

पावसाळ्यात होणाऱ्या सगळ्या आजारांसाठी 'हे' आहे आयुर्वेदातील एक मोठं औषध; जाणून घ्या...

पावसाळ्यात भूक मंदावते, पचनशक्ती कमी होते, भरीत भर म्हणून वातदोषाचाही प्रकोप झालेला असतो. या सगळ्यावर एकाच वेळेस उपयोगी असणारी एक साधी रेमेडी म्हणजे सुंठ गूळ तुपाच्या गोळ्या.

Published by : Dhanshree Shintre

डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे

पावसाळा हा आरोग्याच्या दृष्टीनी सर्वात अवघड ऋतू. ढगाळलेलं आकाश, अधूनमधून येणारी पावसाची सर आणि हवेमधला दमटपणा यामुळे, ‘आला पावसाळा आरोग्य सांभाळा’ हे या दिवसात पदोपदी लक्षात ठेवावं लागतं. पावसाळ्यात भूक मंदावते, पचनशक्ती कमी होते, भरीत भर म्हणून वातदोषाचाही प्रकोप झालेला असतो. या सगळ्यावर एकाच वेळेस उपयोगी असणारी एक साधी रेमेडी म्हणजे सुंठ गूळ तुपाच्या गोळ्या. 

विश्वौषध नावाने ओळखली जाणारी सुंठ हे आयुर्वेदातील खरोखरच एक मोठं औषध आहे. पूर्वीच्या काळी असे वैद्य असत की ते रोग कोणताही असो, फक्त सुंठीच्या मदतीने माणसाला बरं करत असत. आयुर्वेद शिकताना जेव्हा मी पहिल्यांदा हे ऐकलं तेव्हा मला ते खरं वाटलं नाही. पण सुंठ कशा कशावर उपयोगी असते हे अनुभवल्यावर मात्र यावर विश्वास ठेवावाच लागला. मुळात आयुर्वेद म्हणतो, ‘रोगाः सर्वेपि मंदाग्नौ’ म्हणजे मंदावलेला अग्नी हे सर्व रोगांचं मूळ असतं आणि सुंठ भूक सुधारते, पचनास मदत करते आणि अपचनामुळे शरीरात साठलेल्या आमदोषालाही पचवते. त्यामुळे सुंठीला विश्वौषध हे नाव अगदी समर्पक होय. 

अशी गुणकारी सुंठ - एक भाग, चांगल्या प्रतीचा सेंद्रिय गुळ - दोन भाग आणि गोळ्या बनवण्यासाठी आवश्यक तेवढं तूप, एकत्र करून, त्याच्या अशा लहान सुपारी एवढ्या गोळ्या तयार करून ठेवता येतात. अगदी महिनाभर सुद्धा या गोळ्या अगदी छान राहतात. रोज सकाळी यातली एक गोळी खाण्याने पावसाळ्यामुळे मंदावलेला अग्नी प्रदीप्त होतो, पचन सुधारतं, शरीरातला वात दोष नियंत्रणात राहतो. गुडघेदुखी, कंबर दुखी, सकाळी उठल्यावर हाताची बोटं ताठ झाल्यासारखं वाटणं अशा सर्व तक्रारींवर या गोळ्या उपयुक्त असतात. चला तर, विश्वौषध असणाऱ्या सुंठीच्या मदतीने पावसाळ्यातही निरोगी राहू यात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Fort Of Maharashtra in UNESCO : अभिमानास्पद ! महाराष्ट्रातील 12 गड-किल्ले आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत

Latest Marathi News Update live : महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांना जागतिक यादीत स्थान

Digital Arrest Cyber Crime : विश्वास नांगरे-पाटील यांचा AI फोटो वापरून व्हिडिओ कॉल; तब्बल 78 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक

Janasuraksha Bill : विरोधकांच्या सभात्यागानंतरही विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर