वयानुसार शरीरात वातदोषाचं प्रमाण वाढलं, की अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आहारात घरी बनवलेल्या साजूक तुपाचा रोज कमीत कमी चार ते पाच चमचे इतक्या प्रमाणामध्ये समावेश होईल याकडे लक्ष ठेवायला हवं. रात्री झोपण्यापूर्वी कपभर गरम पाण्यात दोन चमचे साजूक तूप आणि चिमूटभर मीठ टाकून घेण्यानीही हार्ड स्टूलचा त्रास बरा होताना दिसतो. बरोबरीनी रोज रात्री झोपण्यापूर्वी पोटावर थंड खोबरेल तेल किंवा आपण स्वयंपाकामध्ये वापरतो ते शेंगदाण्याचं तेल लावण्याचाही त्यांना उपयोग होईल. आहारात चवळी, वाटाणा, राजमा, वाल, चुरमुरे, ब्रेड यासारख्या वातावर्धक गोष्टी टाळणं आणि प्यायचं पाणी उकळलेलं असणं हे सुद्धा आवश्यक.
पोट साफ करण्यासाठी घरच्या घरी एक काढा सुद्धा करून घेता येईल,
यासाठी पातेल्यात चार कप पाणी घ्यावं, यात तीन चमचे गुलाबाच्या पाकळ्या, 10 ते 12 काळ्या मनुका, एक चमचा बडीशोप आणि अर्धा चमचा सोनामुखीची पानं टाकावी. मध्यम आचेवर हे मिश्रण उकळण्यासाठी ठेवावं. एक कप काढा शिल्लक राहिला की गाळून घ्यावा आणि चवीनुसार खडीसाखर मिसळून रात्री झोपण्यापूर्वी घ्यावा. यामुळे सकाळी छान पैकी पोट साफ होण्यास मदत मिळेल. पण हा काढा आठवड्यातून दोन-तीन वेळा घेणंच चांगलं. इतर दिवशी मघाशी सांगितलं तसं गरम पाण्यात तूप मीठ घालून घेणं किंवा दहा ते बारा काळ्या मनुका भिजवून घेणं, पोटावर तेल लावून गरम पाण्याच्या पिशवीनी शेकणं, संध्याकाळचं जेवण हलकं आणि त्यात द्रव असणं हे उपाय योजणंच चांगलं.