भोवळ येण्याच्या त्रासावरही नेमकं निदान होणं आणि त्यानुसार योग्य उपचार होणं हे गरजेचं असतं. रोज एक गोळी घेणं आणि भोवळ आटोक्यात ठेवणं याला काही उपचार म्हणता येत नाही. मुळात आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर वातपित्त दोषातील बिघाडामुळे भोवळ होऊ शकतो, मानेतील बिघाडामुळे किंवा कानातील द्रवामध्ये असंतुलन झाल्यानी सुद्धा भोवळ येण्याचा त्रास सुरू होऊ शकतो. त्यामुळे एकदा तज्ञ वैद्यांना प्रत्यक्ष प्रकृती दाखवून नाडी परीक्षा करून घेणं हे सर्वात चांगलं.
तत्पूर्वी घरच्या घरी रात्री झोपण्यापूर्वी नाकात घरी बनवलेल्या साजूक तुपाचे दोन ते तीन थेंब टाकण्याचा तुम्हाला उपयोग होईल. सकाळी स्नानापूर्वी आणि रात्री झोपण्यापूर्वी मानेला औषधी द्रव्यांनी संस्कारित तेल, उदाहरणार्थ नारायण तेल किंवा धन्वंतरी तेल जिरवण्याचाही फायदा होईल.
याशिवाय आठवड्यातून दोन-तीन वेळा पादाभ्यंग करणं, संपूर्ण अंगाला तेलाचा अभ्यंग करणंही चांगलं. पोटातून काही दिवस ब्राह्मी, जटामांसी, अनंतमूळ यासारखी औषध आणि तयार औषधांमध्ये दाडीमावलेह, कामदुधा आणि वैद्यांच्या सल्ल्यानी सुवर्ण सूतशेखर घेणं हे सुद्धा चांगलं.