कोरोनाच्या संकटामुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक लोकांना लॉकडाऊन , नवे निर्बंध आणि संसर्गाच्या धोक्यामुळे आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. देशाची अर्थव्यवस्थाही संघर्ष करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत देशातील चार महत्वाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या यावर्षी मोठ्या प्रमाणात आयटी प्रोफेशनल तयार करण्याच्या तयारीत आहेत ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर देशात नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
इन्फोसिस, विप्रो, टीसीएस आणि एचसीएल या देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या महत्वाच्या कंपन्या आहेत ज्यांचे ऑपरेशन पूर्णपणे डिजिटल झाले आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर सेवांच्या मागणीमध्ये आधीच्या तुलनेत साधारण दुप्पट वाढ झाली आहे. हीच मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षीच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2021-22मध्ये 45 टक्के जास्त नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. टीसीएस मध्ये 40 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
जगातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या टीसीएसकडून सांगण्यात आले आहे की कंपनी आर्थिक वर्ष 2021-22मध्ये 40 हजार नव्या लोकांना नोकऱ्या देण्याच्या तयारीत आहे. यामुळे कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 5 लाखांच्याही वर जाईल. इन्फोसिस ही कंपनीही या आर्थिक वर्षात 26 हजार नव्या लोकांना नोकरी देणार आहे. तर एचसीएल टेक ही कंपनी यावर्षी 12 हजार नव्या लोकांना कंपनीत घेईल.