सतेज औंधकर, कोल्हापूर
आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. देशभरात नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. सगळीकडे देवीची पूजा, आरती, गरबा अशा जल्लोषात नवरात्रीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. देवीच्या मंदिरात तसेच घरोघरी घटस्थापना केली जाते.
नवरात्रीमध्ये 9 दिवस दुर्गा मातेच्या 9 रुपांची पूजा केली जाते. आज नवरात्रीचा पहिला दिवस असून नवदुर्गेच्या पहिल्या रुपाचे अर्थात देवी शैलपुत्रीची आज पूजा केली जाते.
याच पार्श्वभूमीवर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला आहे. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
अंबाबाई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक आल्याचे पाहायला मिळत असून तोफेची सलामी देत नवरात्रोत्सव सुरु करण्यात आला.