मराठी वर्षातील माघ महिना हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला विशेष अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात प्रथमेश गणेशाच्या स्मरणाने केली जाते आणि त्यामुळेच प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला गणपती बाप्पाचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून चालत आली आहे. माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही या सर्व चतुर्थ्यांमध्ये श्रेष्ठ मानली जाते. यंदा माघ संकष्ट चतुर्थी गुरुवार, ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरी केली जाणार आहे.
गणपती बाप्पा हे अबालवृद्धांचे आराध्य दैवत मानले जाते. तो केवळ विघ्नहर्ता नसून बुद्धी, ज्ञान, प्रेरणा आणि आनंद देणारा देव आहे. समरांगणात अग्रस्थानी उभा राहणारा, आनंदाच्या क्षणी मनसोक्त नाचणारा, गोड पदार्थांचा आस्वाद घेणारा आणि शिक्षणाची आवड बाळगणारा गणेश सर्वांनाच प्रेरणादायी वाटतो. त्यामुळेच गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च मानले जाते. या व्रतामुळे संकटे दूर होतात आणि बाप्पा लवकर शुभ फल देतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे.
संकष्ट चतुर्थीचे व्रत स्त्री-पुरुष, युवक, वृद्ध अशा कोणीही करू शकतो. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध मनाने व्रताचा संकल्प करावा. दिवसभर उपवास ठेवावा आणि गणपती बाप्पाची भक्तिभावाने षोडशोपचार पूजा करावी. गणपतीच्या मूर्तीचा शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. अभिषेकावेळी अथर्वशीर्ष उपलब्ध असल्यास २१ वेळा पठण करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नमः’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. त्यानंतर फुले, दुर्वा, जास्वंद अर्पण करून धूप, दीप व नैवेद्य दाखवावा.
संकष्ट चतुर्थी व्रतात चंद्रोदयाला विशेष महत्त्व आहे. संध्याकाळनंतर चंद्रदर्शनाची वेळ पाहून धूप-दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे. त्यानंतर गणपतीची आरती करून जास्वंदाचे फूल आणि दुर्वांची जुडी अर्पण करावी. चंद्रदर्शनानंतरच उपवास सोडावा, असे शास्त्रात सांगितले आहे. काहीच शक्य नसल्यास किमान एकदा भक्तिभावाने अथर्वशीर्षाचे पठण किंवा श्रवण करावे. माघ संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्रद्धा, संयम आणि भक्तिभावाने केलेले व्रत संकटांपासून मुक्ती देणारे आणि आयुष्यात सकारात्मक ऊर्जा देणारे मानले जाते. त्यामुळेच अनेक भक्त या दिवशी विशेष नियम पाळून गणपती बाप्पाची मनोभावे आराधना करतात.