डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
आयुर्वेदात वनस्पतीला नाव देण्याची पद्धत अगदी व्यावसायिक आहे. ते म्हणजे वनस्पती जशी दिसते, त्याच्याप्रमाणे हुबेहूब वर्णन करणारा एखादा शब्द निवडून ते नाव त्या वनस्पतीला दिलेलं असतं. अशीच एक वनस्पती म्हणजे गोक्षुर किंवा गोखरू.
गो म्हणजे गाय आणि क्षूर म्हणजे खूर. गाईच्या खुराप्रमाणे जीचं फळ असते, ती वनस्पती म्हणजे गोक्षुर. जमिनीलगत पसरणारी ही वनस्पती असल्यामुळे रानमाळ चरताना गाईच्या खूराला लागणारे फळ म्हणजे गोक्षुर. गोक्षुर खूप काटेरी असते. गुजरात प्रांतात गोक्षुर अधिक आणि बऱ्याचदा गवताप्रमाणे उगवते. त्यामुळे एखाद्या मैदानात किंवा जमिनीत अनवाणी पायांनी गेलं तर काटेरी गोक्षुर पायाला लागून इजा सुद्धा होऊ शकते. औषधांत गोक्षुराचे फळ वापरले जाते. फळावर असणाऱ्या काट्यांमुळे ते अतिशय काळजीपूर्वक हातळावे लागते. आयुर्वेदात गोक्षुर त्रिदोष शामक म्हणजे वात, पित्त आणि कफ या तिन्ही त्रासाचं शमन करतो असे सांगितलेलं आहे. चवीला गोड, वीर्यानी शीत, तरीही अग्निदीपन, लघवी साफ, हृदयाचे पोषण, प्रमेह बरा करण्यात अग्रणी असणारा गोक्षुर आयुर्वेदामध्ये मोठ्या प्रमाणात वापरला गेला नाही तरच नवल.
आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये एकेरी वनस्पती सहसा वापरली जात नाही. पण सुश्रुत संहितेमध्ये मुतखडा ( kidney stone) साठी गोक्षूराचा वापर करताना सांगितलं आहे. गोक्षुराच्या फळांचं चूर्ण मधामध्ये मिसळून ते मेंढीच्या दुधासह घेतल्याने एका आठवड्यात मुतखडा नष्ट होतो. यात गंमत अशी आहे की आयुर्वेदामध्ये वनस्पती जशी दिसते, त्याला मिळत्या जुळत्या अवयवावर ती विशेषत्वानी काम करते अशी एक संकल्पना आहे.
उन्हाळे लागतात म्हणजे वारंवार लघवीला जावं लागते, जळजळ होते, त्या ठिकाणी गरम झाल्यासारखं वाटतं, त्यावर गोक्षुराच्या फळांचा काढा, त्यात चिमूटभर यवक्षार टाकून घेण्याचा उपयोग होतो. यासाठी दोन कप पाण्यात दोन चमचे थोडेसे ठेचून घेतलेले गोक्षुर मिसळावे. पाव कप पाणी शिल्लक राहीपर्यंत त्याचा काढा करावा. गाळून घेतलेल्या काढ्यात थोडी खडीसाखर आणि चिमूटभर यवक्षार टाकून घ्यावा. यामुळे लगेचच बरं वाटतं. गोक्षुर ही एक अत्यंत गुणकारी वनस्पती असल्यामुळे याचे आरोग्यदायी फायदे खूप असतात.