Developing shipping in cities to make way for traffic congestion in the city 
ब्लॉग

वॉटर टॅक्सीचा डामाडौल पाण्यात…

Published by : Shweta Chavan-Zagade

भारतातील पहिली वॉटर टॅक्सी (water taxi) मुंबई-नवी मुंबईत सूरू होणार असल्याचे ढोल प्रशासनाकडून जोरदार बडवले गेले… या सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला… आता मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार असल्याचा निर्वाळाही दिला गेला… त्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) आणि मुख्यमंत्री ठाकरे (cm thackrye) यांनी मध्य रेल्वेवरील ठाणे-दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे उद्घाटन केले… सामान्य मुंबईकरांना अशा नव्या प्रकल्पांचे नेहमीच कौतुक असते… याचे कारण या मायानगरीतील प्रवासादरम्यानच्या नरकयातना केवळ मुंबईकरांनाच ठाऊक आहेत…

मुंबई आणि मुंबईबाहेरील ठाणे-नवी मुंबई-पनवेल या शहरांच्या उपनगरातही आता अत्यंत दाट वस्ती झाली असून ही उपनगरे आता नगरे होत असून त्यांची स्वंतंत्र उपनगरे होण्यास सुरूवात झाली आहे… एमएमआरडीएच्या (mmrda) परिगात आता तब्बल चार जिल्हे आणि 9 महानगरपालिका आहेत… येथील सामान्य लोक त्यांच्या रोजी रोटीसाठी साहजिकच उपनगरातून मुख्य शहरांकडे ये-जा करत असतात.. त्यांच्या प्रवासाचा दरडोई खर्च आणि वेळ वाचवण्यासाठी वेगवेगळे उपाय योजण्याचे काम प्रशासनाकडून होत असले तरी उपनगरीय रल्वेसारखा अन्य कोणताही दुसरा पर्याय परवडणारा नाही.. रस्ते आणि लोहमार्गाला पर्याय म्हणून ठाणे-मुंबई-रायगड मधील खाड्या आणि समुद्रकिनाऱ्यांचा वापर जलमार्गासाठी करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्रीय जल, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी हाती घेतला…

शहरातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी शहरांमध्ये जलवाहतूक विकसित करण्यावर त्यांनी भर दिला… त्याचाच एक भाग म्हणून मुंबई व नवी मुंबई दरम्यानच्या वॉटर टॅक्सी सेवेत 12 आसनी आणि 56 आसनी अशा विविध प्रकारच्या वॉटर टॅक्सी सुरू केल्या. त्यात सर्वात कमी तिकीट दर हे 56 आसनी वॉटर टॅक्सीचे आहेत. बेलापूर ते भाऊचा धक्का हा प्रवास 50 मिनिटांत पार करणाऱ्या 56 आसनी वॉटर टॅक्सीसाठी अवघे २९० रुपये तर बेलापूर ते भाऊचा धक्का असा स्पीड बोटीने अवघ्या 30 मिनिटांच्या प्रवास करण्यासाठी 825 ते 1200 रुपये (एकेरी) मोजावे लागणार आहेत… कोरोना काळात मुंबई ते मांडवा ही रोरो सेवा सुरू झाली… अलिबागकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता या सेवेला विकेंडला चांगला प्रतिसाद मिळतोय… मात्र, या सेवेला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही… 56 आसनी टॅक्सीसाठी 290 रूपये मोजावे लागणार असले तरी सामान्यांना हा प्रवास तसा न परवडणारा नाही… जे प्रवासी खासगी वाहनाने मुंबईकडे प्रवास करतात त्यांनाही तसा हा परवडणारा नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.. कारण बेलापूर आणि भाऊचा धक्का जेट्टीवर जाणे खर्चिक आहे… त्यामुळेच प्रवाशांनी सध्यातरी या सेवेकडे पाठ फिरवली आहे… सेवा पुरवणाऱ्यांच्या मते सध्या प्रतिसाद मिळत नसला तरी भविष्यात या सेवेला प्रतिसाद मिळेल… स्पीड बोटीबाबत मात्र तेही साशंक आहे.. कारण या प्रवासाला 1200 रूपये मोजणाऱ्यांची संख्या कमी आहे.. जी मंडळी रोज ओला-उबेर ने ये-जा करतात, त्यांच्याकडून या सेवेचा वापर होण्याची शक्यता आहे… प्रवासांचा वेळ वाचणारा असला तरी दररोजचा खर्च परवडणारा नाही.. असा सूर प्रवाशांनी व्यक्त केला आहे…

भाऊच्या धक्क्यावरून प्रवासी वाहतूक ही इंग्रजांच्या काळापासून सुरू आहे… मांडवा-उरण दरम्यान चालणारी वाहतूक तेथील स्थानिकांना गेल्या अनेक वर्षांपासून परवणारी आहे… तशाच प्रकारची वाहतूक सुरू करणे गरजेचे होते… पण प्रवाशांच्या सूचना लक्षात न घेता सुरू झालेली ही सेवा अवघ्या दोन दिवसात बंद पडण्याचा मार्गावर आहे… वाहतूक व्यवस्थेला पर्याय म्हणून जलद जलवाहतूक पर्यायांचा विचार केला जात असला तरी तो सामान्यांना तो प्रवास परवडणारा करण्याची आवश्यकता आहे… आता ज्या वॉटर टॅक्सींचे उद्घाटन केले आहे, त्या एलिफंटा लेण्यांना जाण्यासाठीही उपलब्ध होणार आहेत… पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना ते दर परवडू शकतात. मात्र, जे नोकरी निमित्ताने ये-जा करतात अशा प्रवाशांना हे दर परवडणारे नक्कीच नाहीत… सध्याचे हे दर केवळ हौसेपोटी जलपर्यटन करणाऱ्यांसाठी परवडणारे आहेत.. मंबई शहरातील वाढती लोकसंख्या आणि प्रवासाची अपुरी व्यवस्था लक्षात घेता मेट्रो हा पर्याय सुलभ आहे… सध्याचे मेट्रोचे दर परवडणारे असले तरी ते भविष्यात तेवढेच राहतील, अशी अपेक्षा करता येणार नाही… मुंबईकरांना उपनगरीय रेल्वे ही अत्यंत परवडणारी सेवा आहे… त्याच्या जोडीली असणारी बेस्ट बसेसची सेवाही अल्पदरातच आहे… आपल्या संपूर्ण देशभरात उपनगरीय रेल्वेसारखी जलद आणि स्वस्त सेवा अन्य कोणतीही नाही… त्यामुळे आता सामान्यांनाही तुलनेने अशी स्वस्त सेवा हवी आहे… जे देणं शक्य नाही…

त्यामुळे सवलतीच्या दरातील सेवा उपलब्ध झाली नाही तरी ती परवडणारी असावी असा एक विचार केल्यास आत्ताच्या प्रवासी सेवेवरील ताण कमी होण्याची शक्यता आहे.. वास्तवात रेल्वेप्रमाणे स्वस्त सेवा अन्य कोणत्याही उपक्रमांना देता येणार नाही… दिल्लीतील सरकारने विद्यार्थी आणि महिलांसाठी स्थानिक बस प्रवास मोफत केला असला तरी त्याचे दूरगामी परिणाम फारसे चांगले राहणार नाहीत. लोकांना मोफत काहीच देवू नये, पण ज्या व्यवस्था दिल्या जातात, त्या परवडणाऱ्या आणि चांगल्या असाव्यात एवढीच त्यांची अपेक्षा असते… मागील सरकारने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात मेट्रोचे जाळे पसरवण्याच्या योजनेचा शुभारंभ केला.. त्यातील अनेक कामे आत्ता पूर्णत्वास येतील… त्यामुळे मुंबईकरांचा भविष्यातील प्रवास सुखाचा होण्याची शक्यता आहे…

मात्र, मुंबईतील दिवसागणिक वाढती लोकसंख्या पाहता निर्माण होणारी व्यवस्थाही भविष्यात कमी पडण्याचीच चिन्हे आहेत.. रेल्वेसह अन्य प्रवासी यंत्रणांवर येणारा ताण कमी करण्यासाठी मागे कार्यालयीन वेळा बदलण्याचा एक प्रस्ताव होता.. मात्र, तो प्रस्ताव केवळ विचाराधीन असल्याचे सांगत बासनात गुंडाळला गेला… मायानगरी मुंबईचे आकर्षण सामन्यांना नवा नाही.. येथील एक सेवा जरी कोलमडली तरी त्याचा मोठा परिणाम प्रवाशांना सहन करावा लागतो… त्यामुळेच प्रशासनाने कोणताही अन्य पर्याय शोधताना त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम यांची सांगड घालण्याची गरज आहे…. नाहीतर आता ही जोरदार डामाडौल करून सुरू केलेली वॉटर टॅक्सी जशी गाळात रूतण्याची शक्यता आहे, तसेच अन्य पर्याय देखील बुडण्याची शक्यता आहे…

                                                                                – नरेंद्र कोठेकर, कार्यकारी संपादक, लोकशाही न्यूज

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : मराठीच्या वाकड्यात जाणाऱ्यांवर राज ठाकरे कडाडले, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Chandrashekhar Bawankule On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर..." ; विजय मेळाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा