भाजपा आणि शिवसेनेतील (bjp -shivsena) राजकीय राडा आता तीव्र संघर्षापर्यत पोहचला आहे…. मागील निवडणुकांच्यावेळी देखील भाजपाच्या नेत्यांना अफझलखानाच्या फौजा असे संबोधण्यापर्यंत संबंध ताणले गेले होते. पुन्हा त्यात एकोपा झाला होता… पण बंद दाराआडच्या चर्चेच्या गुपीतानंतर युतीची टोके पुन्हा कधीही न जुळण्याएवढी परस्परविरोधी ताणली गेली… राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे महाराष्ट्रातील 'मविआ' सरकारच्या स्थापनेनं दाखवून दिलंय… मुख्यमंत्री ठाकरे यांनी याआधी वेळोवेळी भाजपावर टिका टिप्पणी केली आहे… पण, आता त्यांनी सध्या महाराष्ट्रात चाललेल्या धाडसत्रांचा संदर्भ घेत गुजरातमध्ये मोठा घोटाळा उघड झाला. तर त्याकडे कानाडोळा आणि आपल्याकडे चिमूटभर सापडले तर गहजब केला जातो. महाराष्ट्रात सगळीकडे गांजाची शेती होतेय.., असं चित्र उभे करायचं. महाराष्ट्र जणू काही देशातला सगळय़ात सडका भाग आहे अशा पद्धतीनं छापे मारायचे व महाराष्ट्राला बदनाम करायचे हे षडयंत्र आहे. ठीक आहे, प्रत्येकाचे दिवस असतात. दिवस बदलतात हे लक्षात ठेवावे, असा इशारावजा सज्जड दम ठाकरे यांनी भाजपला दिलाय… केंद्रात सत्ता आहे म्हणजे राज्यांची मुस्कटदाबी करत त्यांना बदनाम करायचं, हे सत्तापिपासूपणाचे आणि पातळी सोडलेले राजकारण असून ते देश आणि लोकशाहीला हानिकारक आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गांजाची शेतीच होते आणि तो देशातील सर्वात सडका भाग आहे, अशा पद्धतीने राजकारण केले जात असून हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. पण दिवस बदलत असतात हे लक्षात ठेवावे, असेही त्यांनी भाजपला सुनावले… या मुलाखतीत त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपला सुनावण्याची एकही संधी सोडली नाही… स्वबळावर सत्ता मिळाल्यावर त्या संधीचे सोने करायचे त्याऐवजी देशात ७५ वर्षांत काहीच झाले नाही असे सांगत बसत सत्तेच्या संधीची माती करत आहेत. देशातील सत्ता मिळाल्यावर आता राज्यातील, महापालिकेतील, गल्लीतील सत्ताही त्यांना हवी आहे. सर्व काही तुम्हाला हवंय तर मग आम्ही काय धुणीभांडी करायची का, असा सवाल त्यांनी भाजपाला केला आहे… मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या राज्य सरकारच्या अनेक वर्षांच्या मागणीवरूनही ठाकरेंनी भाजपवर शरसंधान साधले…मराठी ही छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा असून छत्रपतींच्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची तुमची पात्रता आहे का? हा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारपुढे हात का पसरावे लागावेत? असा संतप्त सवाल ठाकरे यांनी केला… आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर का होईना, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा करावी. असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे… मुख्यमंत्र्यांची वक्तव्ये लक्षात घेता त्यांनी भाजपाविरोधात आता जोरदार आघाडी उघडलीय… या मुलाखतीच्या दोन दिवस आधी त्यांच्याच सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेसंसदर्भात त्यांनी थेट उल्लेख टाळत त्यांनी केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपावर आगपाखड केली आहे… याआधी सरकारमधून संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यावरील कारावायांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे… आता विरोधकांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीय… राष्ट्रवादीने यासंदर्भात प्रतिष्ठेचा मुद्दा केला असून त्यांना मलिकांचा राजीनामा घ्यायचा नाही, त्याबाबत स्वतः शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलीय… 'मविआ' सरकारला सातत्याने बदनाम करत त्यांना अस्थिर ठेवण्यात भाजपाला यश मिळतंय… शिवसेनेकडून दररोज संजय राऊत बोलतात तसाच प्रकार आता भाजपाने सुरू केला असून त्यांच्याकडून किरीट सोमय्या रोज 'मविआ'सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे उघडकीय आणले जात आहेत… त्यांच्या जोडीला विरोधी पश्रनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्यासह अनेक नेते सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाहीत… भाजपाच्या या रणनितीत 'मविआ' अडकत चालली आहे, असे काहीसे चित्र आता निर्माण होऊ लागले आहेत… राष्ट्रवादीने मलिकांच्या समर्थनार्थ राज्यभरात आदोलनं केली यात त्यांचे मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसचा सहभाग पाहता यावरून त्यांच्यात एकवाक्यता नाही हे दिसून आलंय… भाजपला कोणत्याही परिस्थितीत 'मविआ'ला नामोहरम करायचं आहे… सरकारने ज्या पध्दतीनं त्यांच्यावर आक्रमक व्हायला हवं ते दिसून येत नसल्यानं भाजपाला त्यांचे ध्येय गाठणे शक्य होतंय… राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांवर कारवाई होणार असा वारंवार दावा भाजपाकडून होतोय.. सोमय्या यांनी 'डर्टी डझन' नावाची यादी प्रसिध्द केली… भाजपाकडून जे बोललं जातंय ते होतानाही दिसत असल्याने 'मविआ'तील अस्वस्थता वाढली आहे… हीच भाजपासाठी यशाची बाब आहे… येणाऱ्या काळातील आगामी निवडणुकीसाठी भाजपाची रणनिती तयार आहे… त्यांनी सरकारमधील तिन्ही पक्षांची कोंडी करण्याची तयारी पूर्ण केली असल्याने 'मविआ'साठी हा काळ कसरतीचा आहे… यावर आता तिन्ही पक्षांनी एकत्रित राहून भाजपाला शह देण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे… शिवसेनेच्या संजय राऊतांनी भाजपाविरोधात जोरदार दंड थोपटले असले तरी त्यांना पक्षातून किती पाठिंबा आहे, यावर साशंकता आहे… त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शक्तिप्रदर्शन केले असले तरी त्यांच्या नेत्यांमध्येही काहिसा संघर्ष आहे…असा संघर्ष भाजपातही नाही असे नाही पण त्यांनी सध्या महाराष्ट्रातील सरकार अस्थिर ठेवण्याचे जे ध्येय ठेवलंय, त्यात ते यशस्वी झाले आहेत… भाजपाकडून होत असलेल्या कारवायांचा फटका भविष्यात त्यांनाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.. याचे कारण भाजपा भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळ्यांबाबत बोलत असेल तर त्यांच्या मंत्र्यांनी वा त्यांच्या पक्षातील नेत्यांनी भ्रष्टाचार वा घोटाळे केलेच नाहीत याची खात्री स्वतः भाजपाची वरिष्ठ नेते मंडळीही देणार नाहीत… याबाबत संजय राऊत यांनी एक विधान केले होते, 'हमाम में सब नंगे…' हे सूचक विधान आहे… अभिनेते नेते होतात आता नेते अभिनेते होवू लागलेत.. कारण आता प्रत्येक नेता सिनेमास्टाईलने आपापले डॉयलॉग मारण्यात धन्यता मानताहेत… सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आपल्याला राजकीय नेत्यांच्या तोंडून पुढे आणखीन अनेक डॉयलॉग ऐकून घ्यायचेत…
नरेंद्र कोठेकर