ब्लॉग

उद्धव ठाकरे यांची अस्तित्वासाठी लढाई...

सध्या महाराष्ट्रातील राजकारणाचा जो विचका झालेला आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील जनता पहिल्यांदाच अनुभवत आहे. त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ती सर्वाधिक जाणवत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

- सुनील शेडोळकर

सध्या महाराष्ट्रातील राजकारणाचा जो विचका झालेला आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील जनता पहिल्यांदाच अनुभवत आहे. नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीत येण्याचा सर्वाधिक फायदा झाला आहे तो महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाला. शिवसेनेचा राजकारणातील लहान भाऊ म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात शिरकाव करणारा भारतीय जनता पक्ष कानामागून येऊन तिखट झाल्याची भावना कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या प्रमुख राजकीय पक्षांना प्रकर्षाने होते आहे. त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ती सर्वाधिक जाणवत आहे.

ऐन चाळीशीत असलेले देवेंद्र फडणवीस यांना नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये अचानक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसविले तेव्हापासून महाराष्ट्रातील राजकीय वारे वेगळ्या दिशेने वाहायला सुरुवात झाली. देवेंद्र फडणवीस यांना अचानक पदलाभ झाल्याचा धसका भारतीय जनता पक्षातील अनेकांना तो बसलेला होता. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना याची मोठी झळ २०१४ ते २०१९ या काळात बसली, सोबतच सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांनाही याची झळ बसल्याचा अनुभव आहे.

भाजपमधील एकनाथ खडसे यांना पक्ष सोडावा लागला, पंकजा मुंडे यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे, विनोद तावडे यांचे पुनर्वसन राष्ट्रीय चिटणीस म्हणून तर चंद्रशेखर बावनकुळे यांना महाराष्ट्र प्रदेशची जबाबदारी मिळाली. उद्धव ठाकरे यांची मात्र दोन मुले, पंधरा आमदार, सहा खासदार, मातोश्री आणि सध्या तरी आपल्याकडे असलेल्या असंख्य कार्यकर्ते यांना सोबत घेत अस्तित्वासाठी झगडा सुरू आहे.

भारतीय जनता पक्षाने दिलेला शब्द पाळला नसल्याचे कारण देत भाजप आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांना २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर कोंडीत पकडले. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा कोणताही शब्द दिला नव्हता असा टाहो भारतीय जनता पक्षाकडून त्यावेळी करण्यात आला, पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आवश्यक संख्याबळ जमू शकते याची आकडेमोड झाल्यानंतर राजकारणातील पत्ते पिसण्यात माहीर असलेल्या शरद पवारांनी संजय राऊत यांना हाताशी धरून महाविकास आघाडीची पटकथा लिहून त्याचा नायक म्हणून उद्धव ठाकरे यांना सिंहासनावर बसविले.

मुख्यमंत्री होण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती असे उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून सांगत आहेत, पण देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचे नाही असे संजय राऊत व शरद पवार यांनी ठरविलेलेच होते. मातोश्रीचे उंबरठे भारतीय जनता पक्षाला व देवेंद्र फडणवीस यांना काही नवे नव्हते. पण, त्यांना आत न घेण्याची एक चूक उद्धव ठाकरे यांना एवढी महागात पडू शकेल याचा अंदाज त्यावेळी खुद्द उद्धव ठाकरे यांनाही आला नसेल. देवेंद्र फडणवीस यांच्यावरील रागापायीच शिवसेनेची २५ वर्षे युतीत सडली अशाप्रकारच्या वक्तव्यांपर्यंत मजल गेली आणि शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या मैत्रीपूर्ण संबंधात उभी फूट पडली.

मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतरही भाजपने महाविकास आघाडीचे सरकार पाडून दाखवावे असे खुले आव्हान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना अनेक जाहीर सभांमधून दिले आणि कदाचित येथूनच हे सरकार पाडण्याचे मनसुबे देवेंद्र फडणवीसांनी रचण्याची सुरुवात केली असावी. सरकार पाडून दाखवाविण्याचे खुले आव्हान मुख्यमंत्रीच देत असल्याने विधानसभेच्या चौकटीत राहून, कायदे, नियम पाळत व प्रशासन चालविण्याचा अनुभव सोबत घेत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला आजपर्यंत लाभलेल्या प्रतिभावान विरोधी पक्षनेते पदाच्या रांगेत बसण्याचा चंग बांधला आणि कोविडचे महाराष्ट्रात थैमान सुरू असताना स्वतः ला दोन वेळा कोविड होऊनही महाराष्ट्र पिंजून काढत एक सक्षम विरोधी पक्षनेता अशी स्वतःची प्रतिमा तयार केली आणि शिवसेनेच्या पहिल्या मंत्र्याचा राजीनामा घेण्यास उद्धव ठाकरे यांना भाग पाडले. पाठोपाठ राज्याचे गृहमंत्री असलेले अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना तुरुंगात पाठवून घरून राज्याचा कारभार हाकणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गर्भगळीत केले. देवेंद्र फडणवीस यांची अडीच वर्षांचा विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ हा त्यांच्या मुख्यमंत्री पदापेक्षा व आजच्या उपमुख्यमंत्री पदापेक्षा अधिक परिणामकारक असा राहिला याचा अवघा महाराष्ट्र साक्ष आहे. कायद्याचा विद्यार्थी असलेले देवेंद्र फडणवीस यांनी आरोप करण्यास निवडलेले विधानसभेचे सभागृह हे राजकीय ज्ञान व चातुर्याची ओळख देणारे ठरले.

पक्षप्रमुख म्हणून असलेली पक्षावरील पकड उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सैल होण्यास सुरुवात झाली आणि सरकारचा रिमोट शरद पवारांनी हाती घेता व अजित पवारांनी निधी वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला झुकते माप दिले असल्याची आकडेवारी विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडली आणि शिवसेनेच्या आमदारांमधील चलबिचल वाढविण्यात फडणवीस यशस्वी झाले आणि मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे वेळीच आपल्या आमदारांना ही गोष्ट पटवून देण्यात कमी पडले आणि मुख्यमंत्री व शिवसेना आमदारातील अंतर वाढत गेले आणि मग राज्यसभा आणि विधान परिषदेत एकट्या देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला धोबीपछाड देताच शिवसेनेचे चाळीस व अन्य दहा अशा पन्नास आमदारांनी गुवाहाटी गाठताच उद्धव ठाकरे यांच्या समोर यक्ष प्रश्न उभा करत राजीनामा देण्यास भाग पाडले.

मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची खरी अग्निपरीक्षा सुरू झाली. आधी सरकार गेले, मग १२ खासदार गेले, पक्षाचे नाव गेले, पक्षचिन्ह गेले आणि उद्धव ठाकरे एकाकी पडले. एवढी पडझड होऊनही जुने व निष्ठावान कार्यकर्ते, आमदार, माजी आमदार, महत्वाचे पदाधिकारी दररोज उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहेत. एका इशाऱ्यावर मुंबईची चाके पळायला लावणारी किंवा थांबविण्याची धमक असलेले उद्धव ठाकरे आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरे यांना आपला जोश हा ठेवावाच लागेल. याउलट उद्धव ठाकरेंचे आर्थिक स्रोत असलेली मुंबई महापालिका ही त्यांच्याकडून हिसकावून घेण्याची रणनीती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन आखत आहेत. कुस्तीच्या आखाड्यात खाली पडून वरच्याचा जीव घेण्याची पद्धत प्रचलित आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात व विशेषतः उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस या एकेकाळच्या राजकीय मित्र २०२४ मध्ये कोणकोणते राजकीय रंग दाखविणार व उद्धव ठाकरे आपली अस्तित्वाची लढाई कशी लढणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय

Kandivali Crime News : गुजराती अभिनेत्रींच्या मुलाने 57 व्या मजल्यावरून उडी घेत स्वतःचे जीवन संपवले