संदिप गायकवाड, वसई | एकमुखी रुद्राक्ष परिधान केल्याने राजकीय व आर्थिक प्रगती होईल, असे आमिश दाखवून, वसईत पंचायत समितीच्या माजी सभापतीला 12 लाखाचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. याबाबत वसई पोलीस ठाण्यात संगनमतातून फसवणूक केली असल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यात दोन आरोपीला अटक केले असून एक मुख्य आरोपी फरार आहे.
वसई पोलीस ठाण्याचे पोलील उपनिरीक्षक विष्णू वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र कृष्णा पाटील (वय 65) असे फसवणूक झालेल्या माजी सभापतीचे नाव आहे. आरोपी हे रुद्राक्ष च्या माळा विकणारे आहेत. राजकीय प्रगती झालेल्या मोठ्या नेत्यांनी एकमुखी रुद्राक्ष परिधान केल्याने त्यांची राजकीय आणि आर्थिक प्रगती झाली आहे. तोच एकमुखी रुद्राक्ष आम्ही तुम्हाला देतो, तो एकमुखी रुद्राक्ष तुम्ही परिधान करा तुमची राजकीय, आर्थिक प्रगती होणार असे आमिष दाखवून सण 2020 मध्ये ही फसवणूक केली आहे. त्यानंतर यांच्यातील एक आरोपी नरेंद्र पाटील यांच्या वारंवार संपर्कात राहून, त्यांना भूलथापा देत 12 लाख रुपयांची रक्कम उकळली. जेव्हा आपली फसवणूक झाल्याची समजल्यावर 25 जानेवारी रोजी पाटील यांनी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी मोठ्या शिताफीने चकाचक सुरेशसिंग भोसले (वय 50) आणि जोरानाथ शंभुनाथ नाथ (वय 65) या आरोपीना बेड्या ठोकल्या.चकाचक हा मूळचा जळगाव तर सध्या तो भिवंडी च्या कोलगाव येथील झोपडपट्टी मध्ये राहत आहे आणि शंभुनाथ हा राजस्थान च्या पाली जिल्ह्यातील राहणारा आहे. यांचा मुख्य साथीदार हा सध्या फरार आहे. वसई न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. मात्र फरार मुख्य आरोपी पकडल्या नंतर यातील मोठे खुलासे होणार असून, किती राजकीय, व्यापारी, सामाजिक क्षेत्रातील लोकांना फसविले ते समोर येणार आहे असे पोलिसांनी सांगितले आहे.