महाराष्ट्रातील रस्ते अपघातांची मालिका काही केल्या थांबेना.आज पहाटे सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णी जवळील आढेगाव शिवारात भीषण अपघात घडला. खासगी प्रवासी ट्रॅव्हल्स पलटल्यामुळे हा अपघात झाला असून त्यात ३० प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये २० जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
ही ट्रॅव्हल शिरपूर (लातूर) येथून पुण्याकडे निघाली होती. पहाटेच्या सुमारास चालकाला झोप लागल्यामुळे वाहन रस्त्यालगतच्या खड्ड्यात जाऊन पलटल्याची घटना घडली. ट्रॅव्हलमध्ये मराठवाडा आणि पुणे भागातील प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यानंतर पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्तांना रुग्णालयात पाठवले. दरम्यान, अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे.
दरम्यान या घटनेवरून खासगी ट्रॅव्हल बस चालकांच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप प्रवाशांना जीव गमावावा लागल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यासंदर्भात प्रशासनाने कठोर नियमावली जाहीर करून त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे.