मयूरेश जाधव | अंबरनाथ | दरवाजाला बाहेरून कडी लावण्याच्या वादावरून शेजाऱ्याने शेजाऱ्यावर हल्ला केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. याप्रकरणी तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हल्लेखोर शेजाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
अंबरनाथ पूर्वेच्या पाठारे पार्क परिसरातील गुलमोहर चौकात साईप्रसाद नावाची इमारत आहे. या इमारतीत जीवन लोखंडे हे त्यांची पत्नी आणि दोन मुलींसह वास्तव्याला आहेत. जीवन यांच्या दरवाजाला वारंवार कुणीतरी बाहेरून कडी लावून ठेवतो. त्यामुळे जीवन आणि त्यांच्या परिवाराला त्रास सहन करावा लागतो. ८ ऑक्टोबर रोजी अशाच पद्धतीने जीवन यांच्या दरवाजाला बाहेरून कडी लावलेली असल्यानं त्यांनी शेजाऱ्यांना विचारपूस केली. शेजारी राहणारे स्नेहा नारगोलकर आणि त्यांची आई प्रियांका या दोघींनी जीवन यांच्या पत्नीला शिवीगाळ केली होती. त्यावेळी जीवन यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एनसी दाखल केली. त्यानंतर पुन्हा एकदा १८ ऑक्टोबर रोजी जीवन हे रात्री कामावरून घरी आले. त्यांना आपल्या दाराला बाहेरून कडी लावलेली असल्याचं दिसलं. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना विचारपूस केली असता. शेजारी राहणारे विनोद नारगोलकर, स्नेहा नारगोलकर आणि स्नेहा यांची आई प्रियांका यांनी घराबाहेर येऊन जीवन यांच्याशी भांडायला सुरुवात केली. त्यातच विनोद नारगोलकर यांनी जीवन लोखंडे यांच्या जांघेवर चाकूने वार केला. तर प्रियांका आणि स्नेहा यांचीही त्यांच्याशी झटापटी झाली. या घटनेनंतर जीवन लोखंडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रियांका चारी, स्नेहा नारगोलकर आणि विनोद नारगोलकर या तिघांच्या विरोधात आयपीसी ३२४, ३५२, ३२३ आणि ३४ यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून. या तिघांनाही अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आलं असता न्यायालयानं जामिनावर सुटका केली.