(Malegaon ) मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात राक्षसी प्रवृत्तीची पराकाष्ठा गाठणारी अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असून, या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. रविवारी दुपारनंतर खेळण्यासाठी घराबाहेर गेलेली चिमुकली बराच वेळ लोटूनही घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. काही तासांनंतरही तिचा मागमूस न लागल्याने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. रात्री उशिरा गावकऱ्यांना मोबाईल टॉवरशेजारी तिचा मृतदेह आढळला. चेहरा छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने तिची हत्या झाल्याचे प्रथमदर्शनीच स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आणि अन्य अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मालेगावच्या सामान्य रुग्णालयात नेण्यात आला. मोठ्या संख्येने जमलेल्या गावकरी आणि नातेवाईकांनी आरडाओरडा करत नाशिक फॉरेन्सिक लॅबमध्येच शवविच्छेदन करण्याची मागणी केली.
पोलीसांनी तत्काळ तपास सुरू करून विजय संजय खैरनार (२४) या तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली. आरोपी हा चिमुकलीचा शेजारी असून चॉकलेटचे आमिष दाखवून तिला घरात बोलावल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रविवारी आरोपीची आजी घरी नसल्याने तो एकटाच होता आणि त्याच वेळेत हे दुष्कर्म केल्याचा पोलिसांचा संशय आहे. टॉवरजवळ मिळालेली मृतदेहाची जागाही आरोपीच्या घरालगत आहे. नाशिकमध्ये करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात चिमुकलीवर अत्याचार झाल्याची आणि डोक्यावर झालेल्या गंभीर मारामुळे मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या भयंकर घटनेनंतर डोंगराळे परिसरात संताप उसळला. सोमवारी गावकऱ्यांनी मालेगाव–कुसुंबा मार्गावर रास्ता रोको करून तीव्र निषेध व्यक्त केला. गावात पूर्ण दिवस बंद पाळण्यात आला. “आरोपीला तात्काळ अटक करून जलदगती न्यायालयातून फाशीची शिक्षा द्यावी,” अशी एकमुखी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. त्यांनीही प्रकरणाला न्याय मिळण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, मालेगाव वकील संघानेही आरोपीविरुद्ध भूमिका घेत, “या क्रूर घटनेत आरोपीचे वकीलपत्र कोणत्याही वकिलाने घेऊ नये,” असा निर्णय जाहीर केला. सोमवारी आरोपीला न्यायालयात उभे केल्यावर खरोखरच एकही वकील त्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढे आला नाही. डोंगराळे परिसरातील ही हृदयद्रावक घटना समाजमनाला चटका लावणारी ठरली असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी जनतेची एकमुखी मागणी आहे.