दिशा सालियन प्रकरणामध्ये आता अनेक खुलासे होताना बघायला मिळत आहे. दिशाच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. दरम्यान दिशाच्या वडिलांच्या वकिलांनी थेट आदित्य ठाकरे, सूरज पंचोली आणि दिनो मारीयो यांची नावे घेतली आहेत. या लोकांना शिक्षा व्हायलाच हवी अशी मागणीदेखील वकिलांनी केली आहे. या प्रकरणी अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच भाजपा खासदार नारायण राणे यांनीदेखील या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
'लोकशाही मराठी'शी बोलताना नारायण राणे म्हणाले की, "दिशा सालियानची हत्या करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिची हत्या केली आहे. त्यावेळी दिशाचे वडील दडपणाखाली होते. मात्र आता खरी परिस्थिती समोर आणली आहे. आता त्यांनी सविस्तरपणे कोर्टाला माहिती दिली आहे. या प्रकरणातील सर्व पुरावे आम्ही पहिल्या दिवसांपासून दिले आहेत. तिची हत्या कशी झाली, तिला कसा त्रास दिला गेला या सगळ्यांचे पुरावे आहेत. तसेच आदित्य ठाकरे त्या ठिकाणी उपस्थित होते. आदित्य ठाकरेंचा याच्याशी थेट संबंध आहे. एका तरुण मुलीची अशी हत्या होणं अत्यंत चुकीचं आहे. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान यांच्या प्रकरणातील सर्व माहिती समोर येईल".