(Badlapur Crime) बदलापूर शहरात तीन वर्षांपूर्वी आजाराने मृत्यू झाल्याची नोंद असलेल्या एका महिलेच्या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. ही महिला नैसर्गिकरित्या मरण पावली नसून, तिच्या पतीनेच मित्रांच्या मदतीने साप चावून तिचा जीव घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. बदलापूर पोलिसांनी पतीसह चार जणांना अटक केली आहे.
बदलापूर पूर्व भागात राहणाऱ्या निरजा आंबेरकर यांचा 10 जुलै 2022 रोजी मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांच्या पतीने हा मृत्यू ब्रेन हॅमरेजमुळे झाल्याचे सांगितले होते. त्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आणि प्रकरण बंद झाले. मात्र, दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ऋषिकेश चाळके नावाच्या आरोपीला अटक झाली. चौकशीत त्याने निरजाच्या मृत्यूमागील खरा प्रकार पोलिसांना सांगितला. पती रूपेश आंबेरकरने पत्नीचा खून करण्याचा कट रचला होता, अशी कबुली त्याने दिली.
या योजनेत रूपेश आंबेरकर, त्याचा मित्र कुणाल चौधरी, सर्प पकडणारा चेतन दुधाणे आणि ऋषिकेश चाळके सहभागी होते. निरजाला पायाला तेल लावण्याच्या बहाण्याने विषारी सापाने चावायला लावण्यात आले. तीन वेळा सर्पदंश झाल्याने तिचा मृत्यू झाला. खून झाल्यानंतर हा मृत्यू आजारामुळे झाल्याचा बनाव करण्यात आला, जेणेकरून संशय येऊ नये. ऋषिकेशच्या माहितीनंतर पोलिसांनी पुन्हा तपास सुरू करून सर्व आरोपींना अटक केली. पतीने पत्नीचा खून का केला, यामागील कारणांचा शोध पोलीस घेत आहेत. तीन वर्षांनंतर हा गुन्हा उघड झाल्याने बदलापूरमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.