वास्तुशांतीसाठी केवळ ३०० रुपयांच्या चांदीच्या नाण्याची खरेदी करायची म्हणत छत्रपती संभाजीनगरमधील जयभवानीनगर येथील एका सराफाच्या दुकानात आलेल्या चोरट्याने अवघ्या ५ सेकंदांत तब्बल ७ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
चोरीची संपूर्ण घटना कैद :
जयभवानीनगरातील गल्ली क्रमांक ३ मध्ये ‘बालाजी ज्वेलर्स’ हे दुकान आहे. दुकानाचे मालक रोहित भारते हे नातेवाइकांच्या लग्नासाठी सांगली येथे गेले होते. त्यांची अनुपस्थिती लक्षात घेऊन त्यांनी दुकान मावस भाऊ जीवन मोरेंकडे सोपवले होते.
१४ मे रोजी संध्याकाळी सुमारास हेल्मेट घालून आलेल्या एका तरुणाने चांदीच्या नाण्याची खरेदी करायची आहे, असे सांगून दुकानात प्रवेश केला. त्याने ४-५ नाणी पाहिली. याच वेळी जीवन मोरे दुकानाच्या काउंटरमागे असलेल्या स्टॉककडे पाहत होते. त्या क्षणाचा फायदा घेत चोरट्याने हातचलाखी करत ७२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन्यांचे पाकीट लंपास केले.
पाच-दहा मिनिटांत चोरी उघड:
जवळपास ५ ते १० मिनिटांनी जीवन मोरे यांनी स्टॉक पुन्हा पाहिला असता, एक डबी कमी असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ रोहित भारते यांना फोन करून माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यावर चोरट्याची कृत्ये स्पष्ट झाली.
असा गेला ऐवज चोरीला:
राजकोट रिंग (५ जोड) – १३ ग्रॅम
कानातील टॉप्स (७ जोड) – १५ ग्रॅम
बटण टॉप्स (८ जोड) – १४ ग्रॅम
कानातील लटकन (१२ जोड) – ३० ग्रॅम
एकूण सोनं – ७२ ग्रॅम (सुमारे ७ तोळे २ ग्रॅम)
चोरट्याचा पूर्वनियोजित डाव?
प्राथमिक तपासात असं समोर आलंय की, चोरट्याने जयभवानीनगर परिसरातील इतर ३-४ सराफ दुकानांमध्येही चोरीचा प्रयत्न केला होता. काही दुकानांतून तो नाणी पाहून निघून गेला, तर एका दुकानातून त्याने प्रत्यक्षात चांदीचे नाणे खरेदीही केलं.
जयभवानीनगर परिसरात एकूण २९ सराफ दुकाने आहेत. त्यामुळे ही पूर्वनियोजित चोरी असल्याची शक्यता पोलिस तपासातून व्यक्त केली जात आहे.
पोलिसांचा तपास सुरू:
या प्रकरणी १६ मे रोजी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी परिसरातील अन्य दुकानांचे फुटेज आणि व्यवहार तपासायला सुरुवात केली आहे.
दुकान मालक बाहेरगावी असल्याने दुकान मावस भावाच्या देखरेखीखाली चालू ठेवण्यात आलं होतं. मात्र, या दरम्यान अशी चोरी होणं म्हणजे दुकान मालकांसाठी मोठा धक्का आहे. स्थानिक व्यापारी वर्गातही भीतीचं वातावरण पसरलं असून, सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.