बालाजी सुरवासे | सामाजिक दबावाखाली मुलीचे लग्न लावून देण्याचे प्रकार नेहमी घडत असतात. याची किंमत मुलींना चुकवावी लागते आणि कधी कधी तर तीचा जीव गमावून चुकवावी लागते. अशी एक दुर्दैवी घटना समोर आली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील अल्पवयीन मुलीचा विवाह उस्मानाबाद तालुक्यातील उत्तमी कायापुर येथील अजित बोंदर या 28 वर्षीय तरुणाशी करण्यात आला होता. कोरोना काळात 11 जून 2020 रोजी या दोघांचा विवाह सोहळा उत्तमी कायापुर येथे पार पडला. त्यानंतर अवघ्या वर्षभराच्या आतच सदरील मुलगी गरोदर राहिली. 7ऑक्टोंबर रोजी तिला बाळंतपणासाठी उस्मानाबाद जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मात्र 13 ऑक्टोंबर रोजी अशक्तपणामुळे तिला सोलापूर येथे हलवण्यात आले यादरम्यान तिचा कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आला 14 ऑक्टोंबर रोजी तिचे सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी या अल्पवयीन मातेच्या निधन झालं कमी वयात लग्न केल्याने आणि मातृत्व आल्याने एका मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणी मुलीचे (वडील) भारत घुगे, (आई) चंद्रकलाबाई घुगे, (मुलीचे काका) लक्ष्मण घुगे, राम घुगे, तर (पती) अजित बोंदर,(सासू) जनाबाई बोंदर, (सासरा) धनराज बोंदर आणि (मुलीची मावशी) सुरेखा बोंदर यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 गुन्हा रजिस्टर नंबर 00/2021 9.10.11. कलमान्वये ग्रामसेवक देविदास चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.