एका 23 वर्षीय परदेशी महिलेला दिल्लीहून मुंबईकडे जात असताना अमली पदार्थ तस्करी केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळालेले हे एक मोठे यश आहे. याप्रकरणी तिच्यावर अमली पदार्थ तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या महिलेची कसून चौकशी केली जात असून अजून मोठे धागेदोरे या यामध्ये सापडण्याची शक्यता आहे.
23 वर्षीय ब्लेसिंग फेवर ओबोह या नायजेरियन महिलेला या प्रकरणी अटक केली गेली आहे. तिच्याकडे जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत सुमारे सात ते आठ कोटी इतकी आहे. ही महिला दिल्लीहून मुंबईकडे बसने प्रवास करत होती आणि तिच्या बॅगेमध्ये मोठ्या प्रमाणात अँफेटामाईन हे अमली पदार्थ सापडले. तिच्या बॅगेची झडती घेतली असता त्याच्यामध्ये दोन किलो 563 ग्रॅम अँफेटामाईन आणि 584 ग्रॅम अमली पदार्थाच्या गोळ्या सापडल्या हे दोन्ही पदार्थ अमली पदार्थ असून त्यांची ने-आण करणे हे कायद्यानुसार गुन्हा आहे.
याप्रकरणी संशयित महिलेला तात्काळ पकडण्यात आले असून तिला डीआरआयच्या कार्यालयामध्ये नेण्यात आले आणि त्यावेळी तिची कसून चौकशी करण्यात आली चौकशी दरम्यान तिने पैशांसाठी ही तस्करी केल्याचे उघड झाले आहे. या तस्करी मधून तिला मोठी रक्कम मिळणार होती आणि त्यामुळे तिने ही तस्करी केल्याचे कबूल केले . मात्र तिचा हेतू साध्य होण्यापूर्वीच तिला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी पकडले.
या प्रकरणांमध्ये कोणत्या मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग आहे की नाही याचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले या प्रकरणांमध्ये जो मुख्य सूत्रधार आहे आणि त्यांचे साथीदार यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सध्या परदेशामधून सुद्धा मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची भारतामध्ये तस्करी चालू आहे भारतामध्ये सुद्धा अमली पदार्थांच्या मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे अशा प्रकारची तस्करी मोठ्या प्रमाणावर चालू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी अशा तस्करी प्रकरणी डीआरआयने बोरवली परिसरांमधून सुद्धा एका तरुणाला अटक केली होती.