गणेशोत्सव विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुण्यात मोठी गुन्हेगारी घटना घडली आहे. नाना पेठ परिसरात एका तरुणावर गोळीबार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री नाना पेठेत एका तरुणावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. गोविंदा गणेश कोमकर असं या मृत तरुणाचं नाव असून, तो घटनास्थळीच मृत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हत्येमुळे पुण्यातील गँगवॉर पुन्हा एकदा उफाळून आल्याचं चित्र दिसत आहे. या हल्ल्यामागे पूर्ववैमनस्यातून सूडाची भावना असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.
कोमकर आणि आंदेकर गटाचं रक्तरंजित वैर
गोविंदा कोमकर हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी संजीवनी कोमकरचा पुतण्या आहे. संजीवनी ही वनराज आंदेकरची बहीण आहे. म्हणजेच, ही हत्या जुना सूड उगवण्यासाठी घडवून आणल्याची शक्यता आहे. वनराज आंदेकरचा खून तब्बल वर्षभरापूर्वी डोके तालीम परिसरात गोळीबार व कोयत्याने वार करत करण्यात आला होता. या हत्येनंतरच पुण्यातील आंदेकर व गायकवाड टोळीमधील संघर्षाला जोर आला होता.
टोळीयुद्ध पुन्हा पेटणार?
वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड व इतरांना अटक झाली असून त्यांच्यावर MCOCA अंतर्गत कारवाई झाली आहे. सध्या ते तुरुंगात असले तरी त्यांच्या गटाने बदला घेण्यासाठी पावलं उचलल्याचं सांगितलं जात आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या हत्येने या संघर्षाला नवा वळण मिळालाय. पुण्यातील गुन्हेगारी वर्तुळात एक वर्षापासूनच “पुन्हा काही तरी मोठं होणार” अशा चर्चांना उधाण आलं होतं, आणि तेच खरे ठरले आहे.