Fishermen Death Toll Rises In Palghar Today : समुद्रकिनारा आणि मासेमारी ही पालघर जिल्ह्याची ओळख असली, तरी गेल्या काही वर्षांत येथील मच्छिमारांवर संकटांची मालिका सुरूच आहे. वादळे, जुनी बोटी, तांत्रिक अडचणी आणि आंतरराष्ट्रीय समुद्रसीमेची अपुरी माहिती यामुळे अनेकांचे जीव गेले, तर अनेकजण परदेशातील तुरुंगात अडकले आहेत.
2010 नंतर पालघर किनारपट्टीवर अनेक मोठे बोट अपघात झाले असून त्यात अनेक मच्छिमारांचा मृत्यू झाला आहे, तर काही अजूनही बेपत्ता आहेत. अलीकडेच झाई परिसरात बोट उलटून चार जणांचा मृत्यू झाला होता. याआधीही डहाणू, वसई, सफाळे भागात अशा दुर्दैवी घटना घडल्या आहेत.
काही मच्छिमार चुकून भारत-पाक समुद्रसीमा ओलांडल्याने पाकिस्तानच्या ताब्यात गेले. सध्या अनेक भारतीय मच्छिमार तेथील तुरुंगात कैद असून काहींनी तिथेच प्राण गमावले आहेत. पालघर जिल्ह्यातीलही काही मच्छिमार यामध्ये अडकले आहेत.
समुद्रसीमेबाबत योग्य माहिती, सुरक्षित साधने आणि आधुनिक तंत्रज्ञान दिले तर हे धोके कमी होतील, अशी मागणी मच्छिमार संघटनांकडून होत आहे. समुद्रावर जाणाऱ्यांचे प्राण वाचवणे हीच आता सर्वात मोठी गरज बनली आहे.