अंधश्रद्धेच्या अंधाऱ्या गर्तेत अजूनही निरागस जीवांचे जीवन धोक्यात येत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री गावात अवघ्या 10 दिवसांच्या बाळावर पोटफुगीच्या आजारावर उपचार करण्याच्या बहाण्याने गरम विळ्याचे 39 चटके देण्यात आले. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पीडित बाळाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून संबंधित वृद्ध महिलेविरुद्ध चिखलदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दहेंद्री गावातील रिचमू धोंडू सेलूकर (25) यांनी 15 जून रोजी मुलीला जन्म दिला. सुरुवातीला बाळाची प्रकृती उत्तम होती, मात्र दहा दिवसांनी सर्दी आणि पोटफुगी सुरू झाली. नर्सने तपासणी करून औषधोपचार दिला होता. 25 जून रोजी गावातीलच एका परिचित वृद्ध महिलेनं बाळाला पाहून "डंबा" देण्याचा सल्ला दिला. पोटफुगी दूर होईल असा विश्वास दाखवत तिने बाळाच्या पोटावर गरम विळ्याने तब्बल 39 चटके दिले. 4 जुलै रोजी पुन्हा नर्स घरी आली असता बाळाच्या पोटावरील गंभीर जखमा पाहून तिने तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. तेथून बाळाला अचलपूर येथील स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बालरोगतज्ज्ञ डॉ. दीपक अग्रवाल आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय शिरसमकर यांच्या देखरेखीखाली उपचारानंतर बाळाची प्रकृती स्थिर झाली आहे. 5 जुलै रोजी बाळाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या प्रकरणाची माहिती मिळताच चिखलदरा पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी वृद्ध महिलेविरुद्ध बालकांसोबत अमानुष वागणूक, जखमी करणे आणि अंधश्रद्धेच्या आधारे त्रास देणे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली.
हे प्रकरण काही अपवाद नाही. केवळ चार महिन्यांपूर्वी चिखलदरा तालुक्यातील थिमोरी गावातही अशाच प्रकारे 22 दिवसांच्या बाळाला डंबा देण्यात आला होता. ग्रामीण भागात अजूनही पोटफुगी, अंगदुखी अशा आजारांवर अघोरी उपचार केल्याने बरे होईल, असा समज प्रचलित आहे. गरम वस्तूने चटके देऊन आजार बरा होतो, ही अंधश्रद्धा बाळकडूंपासूनच निरागस जीवांवर अमानुष अत्याचार घडवत आहे. या प्रकारानंतर आरोग्य विभागाकडून जनजागृती मोहीम राबवण्याची गरज अधोरेखित झाली आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा प्रथांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.