बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा समाज हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील तालवाडा येथील रामनगर भागात एका वडिलांनी कौटुंबिक वादातून आपल्या चार महिन्याच्या बाळाला पाण्याच्या बॅरलमध्ये टाकून जीवे मारले आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत व्यक्तीचे नाव अमोल हौसराव सोनवणे असे असून, पोलिसांच्या माहितीनुसार चार दिवसांपूर्वी त्याचं आणि पत्नीचं भांडण झालं होतं. या वैवाहिक वादातूनच अमोलने टोकाचा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात अलिकडच्या काळात गुन्हेगारी घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीच आणखी एक धक्कादायक घटना घडली. स्थानिक पत्रकार देवेंद्र ढाका यांच्या मुलाची, यश ढाका याची भररस्त्यावर चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात घडली. मित्रासोबत झालेल्या वादातूनच यशच्या छातीत वार करून त्याचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी देवेंद्र ढाका यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी पाच आरोपींवर कलम 302 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. यापैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित चार आरोपी फरार आहेत. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मृतकाच्या नातेवाईकांनी पावसात दोन तास रस्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
बीड जिल्ह्यात सलग घडणाऱ्या अशा दुर्दैवी आणि गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी पोलिस प्रशासनावर कारवाईबाबत प्रश्न उपस्थित करत गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.