बंगळुरुमध्ये महाराष्ट्रातील राकेश खेडकर या व्यक्तीने आपली पत्नी गौरी खेडकर हिची रागाच्या भरात हत्या केली आणि एवढचं नव्हे तर तिच्या मृतदेहाबाजूला बसून तिची माफी मागितली. असाच एक धक्कादायक प्रकार मध्यप्रदेशमधील भोपाळमध्ये घडला आहे. एका प्रियकराने रागाच्या भरात स्वतःच्या प्रियसीला जीवे मारून तिच्या मृतदेहासोबत चार दिवस राहत होता. यासंदर्भात त्याने त्याच्या मित्राला कळवताच तात्काळ त्याच्या मित्राने पोलिसांना बोलावले. यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
भोपाळमधील गायत्रीनगरमध्ये 32 वर्षीय सचिन राजपूत आणि त्याची 29 वर्षीय प्रेयसी रितिका सेन हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एका भाड्याच्या घरात राहत होते. सचिन हा बेरोजगार होता आणि रितिका एका नामांकित कंपनीमध्ये कामाला होती. तिचे आपल्या कार्यालयातील वरिष्ठांसोबत प्रेमप्रकरण असावे असा सचिनला संशय होता. या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरु झाले. वाद इतका वाढत गेला की त्याने रागाच्या भरात रितिकाला जीवे मारले.
मात्र इतक्यावरच न थांबता त्याने तिच्या मृतदेहाला ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून दोरीने बांधून बेडवर ठेवले. चार दिवस तिच्या मृतदेहाच्या शेजारी झोपून राहिला. त्या काळात त्याने अतिमद्यपान केले. चार दिवसांनंतर त्याने हा प्रकार आपल्या मित्राला सांगितला. घाबरलेल्या मित्राने दुसऱ्या दिवशी ही माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी मृतदेहाचे पोस्ट मार्टम केले.
त्यात रितिकाचा मृत्यू चार दिवस आधी झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सचिन राजपूत याला पोलिसांनी अटक केली असून सचिन राजपूत याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात अधिक चौकशी केली जात असून सचिन राजपूतच्या मित्रामुळे हा प्रकार उघडकीस आला.या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून दोघांचे घर सील करण्यात आले आहे.