छत्रपती संभाजीनगरमध्ये वीटभट्टीवर काम करणाऱ्या 13 मजूरांना शिळे चिकन खाल्ल्याने विषबाधा झाली. ही घटना पैठणमधील शहागड रोडवरील आहे. या दुर्घटनेत 33 वर्षी ललिता प्रेमलता पालविया महिलेचा मृत्यू झाला असून इतर 12 जणांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व मजूर हे उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत.
शुक्रवारी आठवडी बाजारातून विकत घेतलेले चिकन शनिवारी १७ मे रोजी जेवणात वापरण्यात आले. त्यानंतर काही तासांत सर्वांना मळमळ, उलटी आणि शारीरिक अस्वस्थतेचा त्रास होऊ लागला. यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रविवारी सकाळी ललिता पालविया यांचा मृत्यू झाला. उर्वरित मजूरांमध्ये गंगाकिशोर ठाकरे (२४), मंगल ठाकरे (४४), सुखराई ठाकरे (४२), सीमा ठाकरे (१७), दीपक ठाकरे (१५), संजय ठाकरे (१२), विमलाबाई गौतम (३८), संगीता गौतम (१८), सलिता गौतम (१९), फुलमती ठाकरे, शिवांगी पालविया (७), राजपाल गौतम (११) आणि राज गौतम (१४) यांचा समावेश असून, डॉक्टरांनी सर्वांची प्रकृतीमध्ये स्थिरता असल्याचे सांगितले.
डॉ. विष्णू बाबर यांच्या माहितीनुसार, वेळेत उपचार मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. शिळे चिकन खाल्ल्यामुळेच त्रास झाल्याची माहिती रुग्णांनी दिली आहे. "शुक्रवारी घेतलेले चिकन शनिवारी वापरले गेले, त्यामुळंच हे घडले," असे रुग्ण मंगल ठाकरे यांनी सांगितले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित अन्न विक्रेत्यांविरोधात कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक प्रशासनाने घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे.