गुन्हेगारीची सावली कधी कधी कुटुंबाच्या पिढ्यांमध्येही पसरते, याचा प्रत्यय छत्रपती संभाजीनगरात आलेल्या एका प्रकरणातून आला आहे. वडिलांप्रमाणेच मुलानेही गांजा तस्करीच्या मार्गावर पाऊल टाकत घरच गांजा विक्रीचे केंद्र बनवल्याचे उघड झाले आहे. सिडको पोलिसांनी केलेल्या धाडीत तब्बल १ किलो ३१० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
तुरुंगातील बाप, तस्करीचा वारसा चालवणारा मुलगा अमोल अशोक भालेराव (वय २६, रा. मिसारवाडी) याच्या घरावर सिडको पोलिसांनी धाड टाकली असता, तेथून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, अमोलचे वडील अशोक भालेराव हे देखील सराईत गांजा तस्कर आहेत, ज्यांच्यावर एमपीडीए (MPDA) अंतर्गत कठोर कारवाई करून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. वडिलांच्या अनुपस्थितीत मुलाने बिनधास्तपणे घरूनच गांजा विक्री सुरू केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
गोपीनाय माहितीवरून मोठा खुलासा सिडको पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर, सहायक पोलिस निरीक्षक योगेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मिसारवाडी येथे अमोलच्या घरावर छापा टाकला. पंचासमक्ष घेतलेल्या झडतीत अमोलच्या जवळ दोन गांजाच्या पुड्या सापडल्या. अधिक तपासणी केली असता, जुन्या कपड्यामध्ये गुंडाळलेल्या प्लास्टिक पिशवीत तब्बल १ किलो ३१० ग्रॅम गांजा आढळून आला.
अत्यंत कुशल नियोजनाची झलक गांजा जप्त करून सिडको पोलिस ठाण्यात स. फौ. सुभाष शेवाळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या धाडीत पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव, एपीआय योगेश गायकवाड, हवालदार मंगेश पवार, प्रदीप दंडवते, विशाल सोनवणे, प्रदीप फरकाडे, सहदेव साबळे आणि मंदा हांडके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या या प्रकरणाचा तपास सपोनि नितीन कामे करत आहेत. संभाजीनगरात गांजा तस्करीला मोठा झटका या घटनेनंतर संभाजीनगर परिसरातील गांजा तस्करीचे जाळे आणि त्यामागील गुन्हेगारी साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. अशा कारवाया गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा धक्का देणाऱ्या ठरू शकतात, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.