छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर गावातून एक संतापजनक आणि अमानुष प्रकार समोर आला आहे. गावातील बिरोबा मंदिर परिसरात संजय रंगनाथ पगार नावाचा एक भोंदू बाबा ‘भूत उतरवण्याच्या’ नावाखाली तसेच मूल होत नाही, लग्न होत नाही, दारू सोडत नाही अशा समस्या घेऊन आलेल्या सामान्य लोकांवर अघोरी आणि लाजीरवाणे प्रकार करत असल्याचे उघडकीस आले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांनी हा भांडाफोड केला असून, संबंधित बाबाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संजय पगार हा रविवारी आणि गुरुवारी मंदिरात दरबार भरवून उपचाराच्या नावाखाली लोकांवर अत्याचार करत होता. मूल होत नाही, लग्न जमणार नाही, अंगात भूतबाधा आहे, दारू सुटत नाही अशा कारणांनी येणाऱ्या नागरिकांना तो भयंकर अमानुषपणे वागवत होता. हा बाबा लोकांना आधी झाडाची पानं खायला लावायचा, नंतर त्यांना काठीने बेदम मारहाण करायचा. एवढ्यावरच न थांबता, स्वतःचा बूट त्यांच्या तोंडात धरायला लावत असे. यापलीकडे, तो आपल्या लघुशंकेचे पाणी "औषध" म्हणून पाजत असल्याचे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आणि त्याचे व्हिडिओ दस्तऐवजीकरण केले. एका महिलेवर हाताने मारहाण करतानाही हा बाबा दिसून आला. अनेक वेळा भक्तांना मंदिराभोवती चक्कर मारायला लावणे, गवतामध्ये झोपवून बुटाने गळ्यावर पाय ठेवणे हे प्रकार त्याच्या दरबारात नेहमीचेच होते.
या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. शिऊर गावात भूतबाधा काढण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या या अघोरी उपचाराचा भोंडाफोड होताच संबंधित बाबा आपल्या काही भक्तांसह फरार झाला आहे. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक विनय राठोड यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे या बाबावर यापूर्वीच एका महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, तिच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. ती म्हणते, “मी तक्रार दिली, ग्रामसभेत मुद्दा उपस्थित केला. दोन तीन वेळा पोलीस स्टेशनमध्ये गेले पण कुणीच काही मनावर घेतलं नाही.”
संजय पगार वय 48-50, पूर्वी लग्नाच्या वरातीत घोडे पुरवण्याचा व्यवसाय करत होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तो ‘बाबा’ बनून बिरोबा मंदिरात दरबार भरवू लागला होता. हा प्रकार उघड झाल्यानंतर अंधश्रद्धेच्या विळख्यात फसणाऱ्या लोकांच्या स्थितीकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. एबीपी माझा आणि अंनिसने जनतेला आवाहन केले आहे की, अशा बुवा-बाबांच्या नादी लागू नये आणि कोणत्याही शारीरिक अथवा मानसिक समस्येसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडेच जावे. सध्या पोलीस तपास सुरू असून संबंधित भोंदू बाबाचा शोध घेतला जात आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेले हे अमानवी कृत्य उघड झाल्याने संपूर्ण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.