जगातील सर्वात श्रेष्ठ असे बाप आणि मुलीचे पवित्र नातं मानलं जातं. पण याच पवित्र नात्याला नालासोपाऱ्यात काळिमा फासला गेला आहे. सख्या बापानेच त्याच्याच चार मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. पीडित मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
आरोपी वासनांध विकृत बाप हा कुख्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, छोटा राजन गँगचा सदस्य आहे. त्याच्यावर खंडणी, गोळीबार, हत्या, सुपारी घेऊन हत्या, दरोडा, चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 2017 पासून हा विकृत वासनांध बापाने आपल्याच मुली, पत्नी यांना दहशतीखाली ठेवून पोटाच्या चार मुलीवर अत्याचार करत होता.
कोकणातील गावी असताना तो या मुलींवर बळजबरी करून बलात्कार करत होता. यापैकी एका मुलीचा चारवेळा गर्भपातही करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या चार मुलींपैकी मोठी मुलगी 21 वर्षांची असून अन्य तीन मुली या अल्पवयीन आहेत.
शेवटी अशा विकृत व्यक्तींच्या तावडीतून सुटण्यासाठी आईने आपल्या मुलींना घेऊन विरार नालासोपारा गाठले. सर्व घटना नातेवाईकाला सांगितल्यावर काल नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक झाली आहे.