बुधवारी सायंकाळी नाशिकच्या जेलरोड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर जोशी (७८) यांनी त्यांच्या आजारी पत्नीची गळा आवळून हत्या केल्यानंतर स्वतः आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मुरलीधर जोशी व त्यांची पत्नी लता जोशी (७६) दोघेही उंबरखेड (जि. जळगाव) येथील शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. निवृत्तीनंतर २०१७ साली नाशिकच्या एकदंत अपार्टमेंट, जेलरोड येथे दोघेंही स्थायिक झाले होते. काही महिन्यांपूर्वी लता जोशी यांना ब्रेन हॅमरेज झाल्याने त्या दीड महिना कोमात होत्या. त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही व अनेक आजारांनी त्या त्रस्त झाल्या होत्या. लाखो रुपये खर्च करूनही आरोग्य ठीक न झाल्याने मुरलीधर जोशी मानसिक दृष्ट्या खचले होते.
त्यांच्या दोन्ही मुलांचा मुंबईत उच्च पदांवर नोकरीस असून, काही दिवसांपूर्वीच दाम्पत्याने त्यांच्याकडे भेट दिली होती. त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्यत्वही घेतले होते. मात्र, पत्नीच्या वेदनांनी त्रस्त होऊन त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांना घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत “आमच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही” असे स्पष्टपणे नमूद केले आहे. ही माहिती घरकाम करणाऱ्या महिलेमार्फत पोलिसांपर्यंत पोहोचली. उपनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तपास सुरू आहे. या दु:खद घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.