माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना नुकतीच नवी मुंबईच्या मानखुर्द मध्ये घडली आहे. एका रिक्षाचालकाने दारूच्या नशेत असताना एका लहान मुलाच्या अंगावर चक्क पिटबुल जातीचा कुत्रा सोडला. त्या कुत्र्याने त्या लहान मुलाचे लचके तोडण्यास सुरुवात केली आणि कहर म्हणजे तो माणूसच नव्हे तर आजूबाजूच्या लोकांनी ही गोष्ट हसण्यावारी नेली आणि केवळ बघ्याची भुमिका घेतली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत असून लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
मानखुर्द मध्ये हमजा नावाचा ११ वर्षीय मुलगा आपल्या मित्रांसोबत खेळात असताना तेथील बाजूला असलेल्या रिक्षामध्ये गेला. त्या रिक्षामध्ये सोहेल खान नामक इसम आधीच दारूच्या नशेत होता. त्याच्याकडे पिटबुल जातीचा कुत्रा होता. त्याने तो कुत्रा त्या ११ वर्षाच्या मुलावर सोडला आणि तो कुत्रा त्या मुलाचे लचके तोडू लागला. अचानक त्या कुत्र्याने त्याच्या हनवटीचा चावा घेतला.त्यामुळे घाबरलेल्या मुलाने एकच टाहो फोडला. तो आपला जीव वाचवण्यासाठी त्या माणसाकडे क्षमा याचना करू लागला. मात्र त्या क्रूर माणसाने त्या मुलाला न वाचवता उलट त्या कुत्र्याला त्याच्या अंगावर सोडले. हे सगळे होत असताना सोहेल खान निर्दयीपणे फक्त हसत होता. तो ११ वर्षीय मुलगा इतका घाबरला की त्याने स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्या रिक्षातून पळ काढला.
दरम्यान तो कुत्रा त्या मुलाच्या मागे लागला आणि त्याने त्याचा ठिकठिकाणी चावा घेतला. या दरम्यान ही घटना घडत असताना आजूबाजूच्या लोकांनी मात्र बघ्याची भुमिका घेतली. काहींनी तर त्याचा व्हिडीओ काढला आणि सोशल मीडियावर टाकला. त्या घाबरलेल्या मुलाने झालेला प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला. तात्काळ त्यांनी मानखुर्द पोलीस स्टेशनला तक्रार केली. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी आरोपी मोहम्मद सोहेल हसन खान विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
या घटनांमुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लहान मुलांना जर असा त्रास दिला जात असेल तर त्यांनी खेळायचे कुठे आणि घरातून बाहेर पडायचे कि नाही ? तसेच लहान मुलाला इतका त्रास होत असताना लोकांमधील माणुसकी कुठे लोप पावत चालली आहे ? असा संतप्त सवाल सध्या सोशल मीडियावर विचारला जात आहे.