पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात शनिवारी (१७ मे) पहाटे आर्थिक वादातून एका तरुणाचा खून झाल्याची गंभीर घटना घडली आहे. ग्रँड हॉटेलसमोर पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली असून, पोलिसांनी या प्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलिसांना तपासात मोठी मदत झाली आहे.
मृत तरुणाचे नाव ज्ञानेश्वर बर्गे असून, त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेप्रकरणी अशोक म्हाळसकर, रोहन म्हाळसकर, प्रसाद म्हाळसकर, अमोल निळे आणि संकेत जैद या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर बर्गे हा अशोक म्हाळसकरकडे आपल्या नातेवाइकांचे पैसे मागत होता. याच कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. शुक्रवारी रात्री दोघे मिळून मद्यपान करत असताना पैशांवरून त्यांच्यात जोरदार वाद झाला आणि ज्ञानेश्वरने अशोकला कानशिलात मारली. हा अपमान सहन न करता अशोकने आपल्या भावंडांना आणि इतर मित्रांना पाचारण केलं.
यानंतर पहाटेच्या सुमारास सर्व आरोपींनी मिळून ग्रँड हॉटेलसमोर ज्ञानेश्वरवर धारदार हत्याराने हल्ला चढवला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत कोयता आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. या घटनेमुळे मोशी परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.