साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. फलटण तालुक्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे. दरम्यान सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने हे फरार होते. दोघांनाही पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं आहे. तर डॉक्टर महिलेने लिहलेल्या सुसाईड नोट मध्ये दोघांवरही शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोप करण्यात आले आहेत.
दोन दिवसांच्या फरारीनंतर अखेर पीएसआय गोपाल बदने पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. अटकेनंतर दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत गोपाल बदने म्हणाला की, "मी प्रामाणिक आहे, पोलीस प्रशासनावर माझा विश्वास आहे." या वक्तव्यामुळे प्रकरणात नवा चर्चेचा विषय निर्माण झाला असून, पुढील चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सातारा- फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सातारा जिल्हा पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे.
गोपाल बदने शनिवारी मध्यरात्री साडे बारा ते दीड वाजताच्या सुमारास स्वतःहून पोलिसांसमोर सरेंडर झाला आहे. गोपाल बदनेवर अत्याचार केल्याचा थेट आरोप करण्यात आला होता. सरेंडर होण्यापुर्वी आरोपी गोपाल बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूर असल्याची माहिती मिळत असून पंढरपूरमधून देखील तो आता पसार झाला. आज रविवार असल्यामुळे त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार का, याबाबत मात्र अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र सध्या गोपाल बदने हा फलटण पोलिसांच्या कस्टडीत असून आज दिवसभर त्याची चौकशी सुरू राहणार आहे. सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दोन्ही संशयीत आरोपी आता पोलिसांच्या स्वाधीन झाले असून या प्रकरणाला टर्निंग पॉईंट आला आहे.