फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला न्याय मिळावा, म्हणून 83 वर्षांचे माजी आमदार नारायण मुंडे हे उद्या दिवसभर बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत. सरकारने योग्य कारवाई न केल्यास बीड ते फलटण काठीच्या आधारावर पायी मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
आज नारायण मुंडे यांनी पीडित डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबीयांची हकिगत ऐकल्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. “ऊसतोड मजुराच्या वाघिणीची लांडग्याने शिकार केली,” अशा कठोर शब्दांत त्यांनी आरोपींवर हल्ला चढवला. सध्या ज्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, ते केवळ नावालाच गुन्हेगार असल्याचा आरोप मुंडे यांनी केला.
“खरे गुन्हेगार मागेच आहेत. येत्या एक महिन्यात त्यांना न पकडल्यास आम्ही आंदोलन अधिक तीव्र करू. 83 वर्षांचा माणूस काठीच्या आधारावर बीड ते फलटण पायी निघेल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. मुंडे यांच्या या उपोषणामुळे प्रकरणाचा तपास, तसेच सरकार आणि पोलिस यंत्रणेवर दबाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.