फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. मृत डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांच्या हाती आला असून, शरीरावर कोणत्याही प्रकारच्या बाह्य मारहाणीचे किंवा जखमेचे निशाण नसल्याचे निष्पन्न झाले आहे. रुग्णालयाकडून पोलिसांना सुपूर्द केलेल्या अहवालामुळे तपासाला नवा आयाम मिळाला आहे.
या प्रकरणात डॉक्टरच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) चीही तपासणी करण्यात आली आहे. या तपासात निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यासोबत मृत डॉक्टरचे अनेकदा फोनवर संपर्क झाल्याचे उघड झाले आहे. मृत्यूच्या काही वेळ आधीही गोपाल बदनेसोबत कॉल झाल्याचे समोर आल्याने संशय अधिक गडद झाला आहे. डॉक्टरने आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलेल्या संदेशात बदनेने चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा तर प्रशांत बनकरकडून सतत मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप नमूद होता.
आरोपीचा मोबाईल शोधण्यात पोलिसांची धांदल
गोपाल बदने शरण येण्यापूर्वी स्वतःचा मोबाईल फोन लपवून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. तो मोबाईल अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नसून, त्यात या प्रकरणाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे डिजिटल पुरावे असण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांसमोर त्या मोबाईलचा शोध लावण्याचे कठीण आव्हान उभे राहिले आहे.
दरम्यान, डॉक्टरच्या हातावर सापडलेल्या सुसाईड नोटच्या हस्ताक्षराची तांत्रिक पडताळणी अद्याप सुरू असून त्याचा अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. या तपासातूनच प्रकरणातील सत्याचा उलगडा होण्याची शक्यता मानली जात आहे.