Radhika Yadav Case Twist : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादव हिचा खून तिच्याच वडिलांनी केल्याची धक्कादायक घटना गुरुग्राममध्ये घडली आहे. गुरुवारी सकाळी 10.30 च्या सुमारास तिच्या राहत्या घरी राधिकाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. तिच्या वडिलांनीच स्वतःच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडल्या. या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. या हत्येनंतर आरोपी वडील दीपक यादव यांना अटक करण्यात आली असून, शुक्रवारी त्यांना गुरुग्राम न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, राधिकाची तिच्या टेनिस कोचसोबत झालेली व्हॉट्सअॅप चॅट समोर आली असून, या संवादातून घरगुती तणाव, आत्मनिर्भर होण्याची इच्छा आणि कुटुंबापासून दूर जाऊन आयुष्य नव्यानं सुरू करण्याचा तिचा निर्धार स्पष्ट होतो
घटनेचा तपशील: स्वयंपाक करत असताना गोळीबार
राधिका यादव (25) ही गुरुवारी सकाळी स्वयंपाक करत असताना, तिचे वडील दीपक यादव (54) यांनी तिच्या कमरेवर गोळी झाडली. एफआयआरनुसार, दीपक यांचं 32 बोरचं परवानाधारक रिव्हॉल्व्हर ड्रॉइंग रूममध्ये दिसून आलं. गोळीबाराचा आवाज ऐकून तिचा काका कुलदीप यादव (46) आणि त्यांचा मुलगा पीयूष वरच्या मजल्यावर गेले असता, राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. त्यांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
व्हॉट्सअॅप चॅटमधून उघड झालेली ताणतणावाची पार्श्वभूमी
मिळालेल्या माहितीनुसार, हाती लागलेल्या राधिकाच्या व्हॉट्सअॅप चॅटनुसार, तिने तिच्या टेनिस कोचशी संवाद साधून तिच्या वैयक्तिक आयुष्यातील ताणतणाव मोकळेपणाने मांडले होते. राधिकाने लिहिलं होतं “इथे खूप पाबंद्या आहेत. मी माझं जीवन जगू इच्छिते, त्याचा आनंद घ्यायचा आहे. कुटुंबापासून दूर जाऊन मी दुबई किंवा ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्याचा विचार करतेय. चीनमध्ये नाही जाणार कारण तिथे खाण्याचे पर्याय कमी आहेत.” तिच्या या संवादातून स्पष्ट होतं की ती स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्यास उत्सुक होती. मात्र घरातील बंदिस्त आणि संशयी वातावरणामुळे तिच्यावर मोठा मानसिक ताण होता.
वडिलांचा मानसिक तणाव आणि समाजाचे टोमणे
पोलिस तपासात दीपक यादव यांनी सांगितले की, गावात त्यांच्यावर सतत टिका केली जात होती. “तू मुलीच्या पैशांवर जगतोस… ती चुकीच्या मार्गाने पैसे कमावते,” अशा अफवा पसरविल्या जात होत्या. या अपमानामुळे ते खूप त्रस्त होते. गेल्या तीन दिवसांपासून ते आत्महत्या करण्याचा किंवा मुलीला मारून टाकण्याचा विचार करत होते.
अकॅडमीवरून झालेल्या वादातून हत्येचा थरार
गुरुवारी सकाळी राधिकाने टेनिस अकॅडमीमध्ये जाण्याचा मुद्दा उपस्थित केला असता, वडिलांशी वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या दीपक यादव यांनी पाच गोळ्या झाडल्या. चार गोळ्या राधिकाच्या शरीरात सापडल्या असून, एक गोळी अद्याप सापडलेली नाही. तिच्या मृतदेहावरून मिळालेल्या जखमांवरून गोळीबाराची तीव्रता स्पष्ट होते.
शक्की स्वभाव आणि अस्थिर मानसिकता ठरली कारणीभूत
पोलिसांनी सांगितले की दीपक यादव यांचा स्वभाव अतिशय शक्की होता. राधिका कोणाशी बोलते, काय करते यावर सतत प्रश्न विचारत असत. राधिकाने त्यांना कित्येकदा समजावण्याचा प्रयत्न केला होता की ती काही चुकीचं करत नाही, पण त्यांचे संशय व स्वभाव अनियंत्रित होत चालले होते. अखेर या अस्वस्थ मानसिकतेतून त्यांनी तिची हत्या केली.
राधिकाचं अधुरं स्वप्न आणि संपलेलं करिअर
राधिका यादव ही टेनिस क्षेत्रातील एक उगवती प्रतिभा होती. तिचा 'गर्ल्स अंडर-18' गटातील सर्वोच्च जागतिक क्रमांक 75 होता. भारतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तिने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. तिच्या अथक मेहनतीमुळे तिने खेळामध्ये स्वतःची ओळख निर्माण केली होती. मात्र कुटुंबातील तणाव, वडिलांचा शक्की स्वभाव आणि समाजाच्या अपमानामुळे हे स्वप्न अर्धवटच राहिलं.
पोलिसांचा तपास सुरू, न्यायाची मागणी
गुरुग्राम पोलिसांनी दीपक यादव यांना अटक करून एका दिवसाची कोठडी मिळवली आहे. पुढील चौकशी वेगाने सुरू आहे. राधिकाच्या हत्येमुळे केवळ खेळ जगतच नव्हे, तर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली वाहत तिच्यासाठी न्यायाची मागणी केली आहे.
हेही वाचा..