बहिणीला छेडल्याच्या संशयातून तीन लहान मुलांना विवस्त्र करून अमानूष मारहाण केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ पश्चिम भागात उघडकीस आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे विवस्त्र करून मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर मारहाण करणाऱ्या आरोपीविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. बाळू खोपडी उर्फ अश्विन असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
दोन वर्षापूर्वी ही पाच वर्षांच्या एका दलित मुलावर मंदिरात चोरी केल्याचा संशय घेण्यात आला. त्यासाठी त्याला नग्न करून गरम टाईल्सवर बसवण्याची शिक्षा दिल्याची घटना वर्धा जिल्ह्यात घडली होती. आता पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती झाली असून विवस्त्र करून मारहाण झालेले तिन्ही अल्पवयीन मुलं हे अंबरनाथ पश्चिम परिसरात राहत आहेत. त्यांच्याच शेजारी आरोपी बाळू खोपडी उर्फ अश्विन राहतो. आरोपीच्या बहिणीला या मुलांनी छेडल्याच्या संशयातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. मात्र, विवस्त्र करून अमानुषपणे मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली आहे.
या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी बाळू खोपडी उर्फ अश्विन याला अटक केली आहे. आज न्यायालयात त्याला हजर केले असता, न्यायालयाने अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे.