पती–पत्नीचं नातं परस्पर विश्वासावर उभं असतं. मात्र हा विश्वास तुटला, की संपूर्ण संसार हादरतो. जपानमध्ये घडलेल्या एका घटनेनं हेच पुन्हा सिद्ध केलं आहे. अत्यंत शांत, कोणाशी फारसा न बोलणारा, लाजाळू स्वभावाचा वाटणारा नवरा प्रत्यक्षात वेगळ्याच आयुष्याचा खेळ खेळत होता, हे जेव्हा पत्नीसमोर आलं, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
नेमु कुसानो नावाच्या या महिलेचा विवाह ओळखीतील एका मित्रामार्फत झाला होता. पतीचा साधा, अबोल स्वभाव पाहून तिने त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवला. “हा माणूस मला कधीच धोका देणार नाही,” अशी तिची ठाम समजूत होती. मात्र वास्तव वेगळंच निघालं.
बॅगेत सापडलेल्या वस्तूंनी उघड झालं गुपित
एकदा पती घरी नसताना कुसानो हिने त्याची बॅग उघडली. त्यात कंडोम आणि वायग्रा सापडले. या एका धक्क्यानेच तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर तिने पतीचा मोबाईल तपासला. फोनवर डेटिंग अॅप्सचे संशयास्पद नोटिफिकेशन्स, चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स पाहून सत्य हळूहळू उघड होत गेलं.
500 हून अधिक महिलांशी संबंध
चौकशी वाढत गेली तसं धक्कादायक चित्र समोर आलं. पतीचे एस्कॉर्ट सर्व्हिस देणाऱ्या महिलांशीच नव्हे, तर एडल्ट चित्रपटांत काम करणाऱ्या अभिनेत्रींसोबतही संबंध होते. एकूण तब्बल 520 अफेअर्सचे पुरावे कुसानो हिच्या हाती लागले. इतक्या मोठ्या प्रमाणावरची बेवफाई पाहून ती पूर्णपणे कोलमडली.
मुलाचं दुर्मिळ आजारपण आणि एकट्याची झुंज
या सगळ्यात आणखी एक वेदनादायक बाब म्हणजे कुसानोचा मुलगा एका अत्यंत दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. जगभरात मोजक्याच लोकांना हा आजार आहे. पती कामानिमित्त बहुतेक वेळा घरी नसल्यामुळे मुलाचं संगोपन, उपचार, दवाखाने – सगळं काही कुसानो एकटीच सांभाळत होती.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट आणि जपानी वृत्तपत्र ‘शुकान बंशुन’नुसार, पतीने आपल्या वर्तनाचं समर्थन करताना “कामाचा ताण कमी करण्यासाठी मी हे करतो, घरात ताण आणत नाही,” असं थेट विधान केलं. विशेष म्हणजे त्याला आपल्या कृत्यांचा कोणताही पश्चात्ताप नव्हता.
सेक्स अॅडिक्शनचं निदान
सुरुवातीला कुसानोला पतीविरोधात कारवाई करायची होती. मात्र त्याचा परिणाम मुलावर होईल, हे लक्षात येताच तिने वेगळा मार्ग निवडला. तिने पतीला डॉक्टरांकडे नेलं. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला ‘सेक्स अॅडिक्शन’ असल्याचं निदान केलं. ही सवय शाळकरी वयापासून असल्याचंही समोर आलं.
योगा जर्नलला दिलेल्या मुलाखतीत कुसानोने सांगितलं की या आजाराबाबत माहिती मिळाल्याने तिला मानसिक दिलासा मिळाला. मुलाच्या भविष्यासाठी तिने पतीशी संवाद साधण्याचा, थेरपीचा मार्ग स्वीकारला.
वेदनेचं रूपांतर कलेत
अखेर कुसानोने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि मुलाचा सांभाळ स्वतः करण्यास सुरुवात केली. मात्र ही कहाणी दडपून न ठेवता तिने ती जगासमोर आणण्याचं ठरवलं. जपानी मांगा कलाकार पिरोयो अराई यांच्या मदतीने तिने आपल्या आयुष्यावर आधारित सचित्र कॉमिक (मांगा) तयार केली.
या माध्यमातून तिने केवळ स्वतःचं दुःख मांडलं नाही, तर अनेक सिंगल मदर्सना बळ दिलं. “कलेच्या माध्यमातून मी स्वतःला सावरत आहे,” असं कुसानो म्हणते. तिची ही धाडसी पावलं आज अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.