बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलातील 17 वर्षीय विद्यार्थिनीवर वर्षभर लैंगिक छळ केल्याचा आरोप, संचालक विजय पवार आणि शिक्षक प्रशांत खाटोकर यांच्यावर करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटली असून, सामाजिक संघटनांनी शुक्रवारी क्लासेस समोर जोरदार निदर्शने केली.
ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत क्लास बंद केला असून, राज्य महिला आयोगाच्या आदेशानुसार क्लासेस सील करून सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
विद्यार्थिनीने पोलिसांना दिलेल्या जबाबात खळबळजनक माहिती दिली आहे. खाटोकर यांनी तिच्यावर बॅड टच केल्याचे आणि तिचे अनुचित अवस्थेतील फोटो काढल्याचे ती म्हणाली. याबाबत तिने विजय पवार यांना सांगितल्यानंतर त्यांनीही तसेच वर्तन केल्याचा आरोप तिने केला. त्यामुळे क्लासला जायलाही भीती वाटू लागली होती, असे तिने स्पष्ट केले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर ॲड. संगिता धसे, प्रा. सचिन उबाळे, वर्षा जगदाळे, मोहन आघाव, माऊली सिरसाट यांच्यासह अन्य नागरिकांनी क्लासेससमोर निदर्शने करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, विजय पवार हे एका शैक्षणिक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष असून, त्यांचे विविध राजकीय नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संतापात भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी संघटनेकडून बीड शहरात शैक्षणिक बंदचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, अशा प्रकाराच्या इतर घटनांचीही चौकशी केली जात आहे. इतर पीडित विद्यार्थिनी पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.