संदिप गायकवाड | वसईत मुख्य रस्त्यावरील गटारावर महापालिकेच्या वतीने लावण्यात येणारे लोखंडी झाकण चोरी करून फरार होणाऱ्या टोळीचा वसईत भांडाफोड झाला आहे. या टोळीतील एका आरोपीला पकडण्यात यश आले असून, 2 जण फरार झाले आहेत. याबाबत वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वसई विरार महापालिकेच्या वतीने शहरातील अनेक भागात गटाराचे नियोजित काम झाले आहेत. गटाराच्या चेंबरवर मजबूत असे लोखंडी झाकण लावले आहेत. पण हेच लोखंडी झाकण चोरणारी टोळी शहरातील विविध भागात मागच्या काही महिन्यांपासून सक्रिय झाली होती. त्यामुळे अनेक झाकण चोरी झाले पण कोण चोरतय याची मात्र माहिती मिळत नव्हती. 2021 च्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वसई गाव मार्सेस च्या मुलारवाडी परिसरातील गटाराच्या चेंबर वरील लोखंडी झाकण चोरी झाले होते. झाकण चोरी करून, ते टेम्पोत टाकून घेऊन जातानाचे दृश्य एका बंगल्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. गावक-यांनी हा सीसीटीव्ही व्हायरल करून याबाबत जनजागृती केली होती.
काल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अटक आरोपी हा पुन्हा मार्सेस गावात आपला टेम्पो घेऊन गेला असता, गावकऱ्यांनी त्याला ओळखून, त्याला पकडून ठेवून तात्काळ पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने झाकण चोरल्याची कबुली दिल्यानंतर त्याच्या विरोधात वसई पोलीस ठाण्यात संगांमतातून चोरी केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केले आहे. श्याम शिवाजी पाटोळे (वय 19) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून , तो वसईच्या राणगाव लहुपाडा येथील रहिवासी आहे. अटक आरोपी कडून 60 हजार किमतीचे 4 लोखंडी झाकण ही जप्त केले आहेत. अटक आरोपीला आज वसई न्यायालयात हजर केले असता 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती वसईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी सांगितले.