सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट शहरात प्रेमसंबंधातून तरुणीची धारदार शस्त्राने हत्या करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली. स्वामीभक्त असल्याचे भासवून खासगी घरात भाड्याने थांबलेल्या प्रियकराने प्रेयसीचा गळा पाडला. आरोपीने नंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला असून, सध्या तो सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.
ही घटना ४ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास अक्कलकोट शहरातील हद्दवाढ भाग, बासलेगाव रोड परिसरात घडली. स्नेहा श्रीकांत बनसोडे (२०, रा. पोगुलमाळा, रामवाडी, सोलापूर) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. आरोपी आदित्य रमेश चव्हाण (२२, रा. नागूरतांडा, ता. अक्कलकोट) याने अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सूत्रानुसार, स्नेहा आणि आदित्य यांच्यात दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते. ४ जानेवारी रोजी दोघेही बासलेगाव रोडवरील लोखंडे मंगल कार्यालयामागील पिरजादे प्लॉटवरील कोळी यांच्या घरात थांबले होते. आरोपीने स्वामीभक्त असल्याचे सांगून एका दिवसासाठी खोली भाड्याने घेतली होती. सकाळी दोघांमध्ये वाद झाला आणि तो हिंसाचारात बदलला. आदित्यने धारदार शस्त्राने स्नेहाचा गळा पाडला. ती जागीच मृत्यू पावली. त्यानंतर आरोपीने स्वतःच्या गळ्यावरही वार केला.
घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट उत्तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी यामावार यांनी पाहणी केली. फिर्यादी लक्ष्मी श्रीकांत बनसोडे (४०, रा. सोलापूर) यांच्या तक्रारीवर भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याचे कलम ३(२)(व्ही) अंतर्गत गुन्हा दाखल झाला. पुढील तपास प्रभारी पीआय दीपक भिताडे करीत आहेत.