उत्तर प्रदेशमधील बीजनौरमध्ये काही दिवसांपूर्वी रेल्वे कर्मचारी दीपक कुमार यांच्या हत्याप्रकरणातील नवीन माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये दीपकची हत्या त्याची पत्नी शिवानीने केल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानीने पतीचा गळा आवळून त्याचा जीव घेतला. मात्र शिवानीचा उजवा हात आधीच फ्रॅक्चर होता. तरीही तिने डाव्या हाताचा वापर करुन पतीचे आयुष्य संपवले. या सगळ्या प्रकारामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
नक्की काय घडले?
दीपकला अनेक दिवसांपासून पत्नी शिवानीवर संशय होता. या संशयामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. गावात पतीच्या कुटुंबासोबत राहण्यास नकार देणारी शिवानी, नजीबाबाद शहरात आपले स्वतंत्र आयुष्य जगू इच्छित होती. मात्र, दीपकने त्यांना गावातच ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिवानी नाराज होती.याशिवाय, दीपकचा संशयी स्वभाव आणि शिवानीला होणारी मारहाण यामुळे शिवानीचा संताप अधिक वाढला.
हत्येचा घटनाक्रम :
पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले की शिवानीने आधी दीपकला जेवणात नशेचे पदार्थ मिसळून खाऊ घातले. जेव्हा दीपक बेशुद्ध झाला, तेव्हा तिने डाव्या हाताने त्याचा गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर तिने कुटुंबीयांना आणि पोलिसांना सांगितले की दीपकचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला आहे.मात्र, शवविच्छेदन अहवालात ही बाब खोटी सिद्ध झाली. अहवालानुसार, दिपकचा मृत्यू हा गळा दाबल्याने झाला असल्याचे स्पष्ट झाले.
तपासात समोर आलेले पुरावे :
पोलिसांच्या हाती लागलेल्या एका व्हिडिओमध्ये दीपक आणि शिवानी यांच्यातील भयंकर भांडण ऐकायला येत आहे. तसेच या व्हिडिओमध्ये त्यांच्या लहान मुलाच्या रडण्याचा आवाजही स्पष्टपणे ऐकू येतो. दरम्यान पोलिसांनी संपूर्ण हत्येचा प्रसंग पुन्हा काल्पनिकरित्या घडवला आणि फ्रॅक्चरमुळे शिवानी डाव्या हाताने हालचाल करू शकत नव्हती त्यामुळे शिवानीने डाव्याने गळा आवळल्याचे निश्चित झाले.
दीपकच्या कुटुंबाची मागणी :
मृत दीपकच्या कुटुंबीयांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन या प्रकरणात सखोल तपासाची मागणी केली आहे. त्यांचा आरोप आहे की, शिवानी एकटीने ही हत्या केली नसून तिच्यासोबत इतर कुणाचा सहभाग असू शकतो असा दाट संशय व्यक्त केला. शिवानीने केवळ नोकरी आणि पैशासाठी दीपक ची हत्या केल्याचा मृतक कुटुंबियांचा आरोप आहे. दरम्यान संपूर्ण प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, पोलिस लवकरच अधिक खुलासे होतील अशी शक्यता आहे.