वैष्णवी हगवणे प्रकरणा पाठोपाठ आता पुण्यातील धनकवडी परिसरात एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. वर्षा तुकाराम रणदिवे (वय ३५) या विवाहित महिलेने सासरच्या सातत्याने होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, समाजमाध्यमांवरही तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात वर्षा यांचे वडील तुकाराम रणदिवे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी उज्वला बागाव (वय ५३), योगेश बागाव (वय ३५), वैशाली बागाव (वय ३२) आणि सुवर्णा बागाव (वय २५) या चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस तपासानुसार, बागाव कुटुंबीय आणि रणदिवे कुटुंबीय एकाच परिसरात शेजारी राहत होते. उज्वला आणि तिची मुले वर्षा यांना वेळोवेळी टोमणे मारत, मानसिक त्रास देत होते. या छळाला कंटाळून वर्षा यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात स्तब्धता पसरली असून, वर्षा यांच्या कुटुंबीयांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सहकारनगर पोलीस पुढील तपास करत आहेत. महिलांवरील छळ थांबवण्यासाठी समाजात जागरूकता निर्माण होण्याची गरज या प्रकरणामुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.